सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी थकविली ६७५ कोटीची एफआरपी

सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी थकविली 675 कोटीची एफआरपी
संचार वृत्त अपडेट
सोलापूर जिल्ह्यातील २५ साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे ६७५.६४ कोटी रुपये थकवले आहेत. जिल्ह्यातील गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र शेतकऱ्यांना अद्याप उसाचे पैसे मिळालेले नाहीत.
जिल्ह्यात ३१ जानेवारीअखेर ८८ लाख ५३ हजार २३ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. दुष्काळी स्थितीमुळे जिल्ह्यात यंदा उसाचा तुटवडा होता. त्यामुळे ऊस मिळवण्यासाठी साखर कारखान्यांकडून मोठी चुरस रंगली होती. तरीही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत.
जिल्ह्यात १०.२५ टक्के ऊस उताऱ्याने साधारणपणे ३४०० एफआरपी होते. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १५ फेब्रुवारी अखेर १६२९ कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र जवळपास 2५ कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे पैसे थकवले आहेत. जिल्ह्यातील पांडुरंग सहकारी, सहकार महर्षी, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे दोन युनिट, ओमकार, व्हीपी शुगर्स या सहा कारखान्यांनीच १०० टक्के पैसे दिले आहेत तर ५० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणाऱ्या कारखान्यांमध्ये सिद्धेश्वर, लोकनेते, लोकमंगल, सिद्धनाथ, जकराया, इंद्रेश्वर, भैरवनाथ, जयहिंद, धाराशिव, अवताडे शुगर या कारखान्याचा समावेश आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे म्हणाले की अद्याप कारखान्यांनी पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे या प्रश्नासाठी मार्च एप्रिलमध्ये आंदोलने केली जाणार आहेत. दरम्यान, साखर सहसंचालक प्रकाश अष्टेकर यांनी सांगितले की थकीत एफआरपी देण्यासाठी कारखान्यांवर दबाव वाढवला आहे याबाबत आता सुनावणी घेतल्या जातील आणि त्यानंतर कारवाई केली जाईल.