सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडून पाच ऊस तोडणी यंत्राची खरेदी
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडून पाच ऊस तोडणी यंत्रांची खरेदी
श्रीपुर (बी.टी.शिवशरण जेष्ठ पत्रकार)
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2024-25 सुरू करण्याचे दृष्टीने तयारी सुरू केली असून कारखान्याने पाच ऊस तोडणी यंत्राची खरेदी केली आहे. त्याचे पूजन वाखरी येथील प्रशासकीय कार्यालयासमोर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांचे शुभ हस्ते, कारखान्याचे व्हा.चेअरमन कैलास खुळे व कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी आणि संचालक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी माहिती दिली की, महाराष्ट्रातील सर्वच साखर कारखान्यांना सध्या तोडणी यंत्रणेची कमतरता जाणवू लागली आहे. कारखान्यास पूर्वी बीड, नगर, जालना ,नंदुरबार जिल्ह्यातील तोडणी मजूर मोठ्या प्रमाणावर मिळत होते. परंतु सध्या ऊस तोडणी मजूर मिळण्याचे प्रमाण खूपच कमी झाले असल्याने पूर्ण गाळप क्षमतेने कारखाना चालवण्याच्या दृष्टीने मजुरांचा पुरवठा होऊ शकत नाही. हे वेळीच कारखाना व्यवस्थापनाच्या लक्षात आल्याने तोडणी यंत्राची गरज ओळखुन एस.फाम कंपनीची पाच ऊस तोडणी यंत्रे खरेदी केली आहेत. ही ऊस तोडणी यंत्रे आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केली असल्याने शेतकऱ्यांना व कारखानदारांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.यावेळी बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की, पाठीमागील दोन गळीत हंगामाचा आढावा घेतला असता ऊस तोडणी मजूरांच्या संख्येमध्ये घट होवून ऊस तोडणीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अडचणी येऊ लागल्या. गळीत हंगाम 2024-25 साठी कारखाना व्यवस्थापनाने अधुनिकीकरणाचा वापर करणेसाठी एस.फाम कंपनीच्या ऊस तोडणी मशिन खरेदी करुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविणेचा प्रयत्न केला आहे. ऊस तोडणी मशिनमुळे कारखान्यास प्रती दिन 500 मे.टनाचा जास्तीचा ऊस पुरवठा होईल. कारखाना व्यवस्थापनाने कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली तोडणी यंत्राची खरेदी करण्याचा निर्णय घेऊन एक प्रकारे शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. हंगाम अखेरीस तोडणी मजुरांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांस ऊस तोडणीसाठी त्रास होतो. वेळप्रसंगी शेतकऱ्यांना त्याची काही प्रमाणात झळ बसत असते. कारखान्याने ऊस तोडणी यंत्रे खरेदी करणे आवश्यक असल्याने आज कारखान्याने प्राथमिक स्वरूपात पाच ऊस तोडणी यंत्रे खरेदी केली आहेत. यानंतरही गरजेप्रमाणे ऊस तोडणी यंत्रे खरेदी करण्याचा निर्णय व्यवस्थापन घेईल. गळीत हंगाम 2024-25 सुरू करण्याचे दृष्टीने कारखान्याची सर्व कामे प्रगतीपथावर असून थोड्याच दिवसात कारखाना सुरू करण्यासाठी सज्ज होईल. हंगाम सुरुवातीपासूनच तोडणी यंत्रे ऊस तोडणीचे काम करणार असून कारखान्याच्या पुर्ण क्षमतेप्रमाणे ऊसाचा पुरवठा केला जाणार आहे.
यावेळी एस.फाम. या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही तोडणी यंत्राच्या उपयुक्तेची व आधुनिकतेची माहिती दिली असून तोडणी यंत्रे कशी फायद्याची आहेत हे उपस्थितांना सांगितले.यावेळी कारखान्याचे संचालक.दिनकरराव मोरे, वसंत देशमुख, .दिलीपराव चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, .तानाजी वाघमोडे, .बाळासाहेब यलमर, .भगवान चौगुले, .लक्ष्मण धनवडे .भास्कर कसगावडे, .भैरू वाघमारे, .गंगाराम विभुते, .सुदाम मोरे, .विजय जाधव, .हनुमंत कदम, .किसन सरवदे, .दाजी पाटील, .दिलीप गुरव, .सिताराम शिंदे, .शामराव साळुंखे, .राणू पाटील आदी व कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.