एका दिवसात केले 70 की मी अंतर पार बाभुळगाव ते शिखर शिंगणापूर

एका दिवसात केले 70 की मी अंतर पार बाभुळगाव ते शिखर शिंगणापूर
संचार वृत्त अपडेट
बाभुळगाव ता. माळशीरस येथील व्यसनमुक्त युवक संघांचे शिलेदार श्री संजय पराडे व त्यांचे सात साथीदार यांनी बाभुळगाव ते शिखर शिंगणापूर हे सुमारे 70 की मी. चे अंतर एका दिवसात पूर्ण करून तरुण पिढी समोर एक आदर्श निर्माण केला आहे.
चैत्र महिना म्हटलं की, पंढरपूर आणि शिंगणापूर येथील यात्रेचा कालावधी. या यात्रेसाठी विदर्भ मराठवाडा भागातून असंख्य भक्त मंडळी श्री विठ्ठलाच्या व शिंगणापूर येथील महादेवाच्या दर्शनासाठी पायी येतात. महादेव हे सर्वांच्या नवसास पावणारे भोळे दैवत असून याची भक्ती लाखो भाविक करीत असतात. ऐन उन्हाळ्यात, भयंकर उष्णता असताना अनेक भक्तगण पायी चालत दर्शनासाठी जातात. बाभूळगाव येथील काही युवक ही पायी वारी न चुकता प्रतीवर्षी करतात. बाभुळगाव, संगम, अकलूज, माळशीरस,नातेपुते या मार्गांवरून ते शिंगणापूर येथे पोहचतात. पायी चालणं ही पद्धत आता कुठेतरीच पहायला मिळत असून आळंदी ते पंढरपूर या मार्गांवरून चालणारे महिन्याचे वारकरी सोडले तर आता हे चित्र कुठेच पाहायला मिळत नाही. मात्र यास बगल देत बाभुळगाव येथील युवक हे शिंगणापूर येथे पायी जात असतात. रात्री दोन ते दुसऱ्या दिवशी सहा वाजेपर्यंत हा पायी प्रवास चालू असतो. ऐन उन्हात, भयंकर उष्णता असताना हे कठीण असणारे व्रत ते आजही करतात हे सर्व युवक निर्व्यसनी असून वारकरी आहेत. आज पर्यंत त्यांनी बारा ज्योतिर्लिंग,चार धाम, साडेतीन शक्तिपीठ असा प्रवास त्या ठिकाणी जाऊन पायी केला आहे या पायी मोहिमेत संजय (बंडू)पराडे,बाळासो पाटील, आप्पासाहेब माने देशमुख, रणजित पराडे, नारायण पराडे, राजाभाऊ पराडे,अनिकेत सातपुते, पंजाब क्षिरसागर,हे सहभागी झाले आहेत.त्यांच्या या पायी मोहिमेबद्दल सर्वत्र कौतुक होत असून अनेकांना याची प्रेरणा मिळत आहे.