अकलूज येथे संगीतमय इस्टलिंग महापूजा मोठ्या उत्साहात संपन्न

अकलूज येथे संगीतमय इष्टलिंग महापूजा मोठ्या उत्साहात संपन्न.
संचार वृत्त
संग्रामनगर दि.२९ (केदार लोहकरे)
अकलूज येथील महादेव मंदिरात प.पु.त्रिकालवंदनीय श्री.ष. ब्र.१०८ सदाशिव शिवाचार्य महास्वामीजी बृहन्मठ वेळापूर यांची भव्य संगीतमय इष्टलिंग महापूजा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली. अतिशय शिस्तबद्ध,विविध दिवे, निरांजन व आरतीसह विविध सोपस्कारांनी सुमारे पाच तास चाललेल्या या पूजेने उपस्थित शिवभक्तांच्या डोळ्याचे पाणी पडले.
अकलूज येथील बसवेश्वर चौकात असणाऱ्या महादेव मंदिरात वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने आयोजित या महापुजेसाठी महाराजांच्या आगमन होताच समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.त्यानंतर सोवळ्यातील स्नान करून ईस्टलिंग महापूजेस प्रारंभ करण्यात आला.विविध उपचाराने व संगीताच्या सुमधुर लईत,विविध नामस्मरण व जयघोषात पूजा करण्यात आली.पूजा नंतर महाराजांनी शिवभक्ती आणि गुरूबद्दलचे महत्व आपल्या आर्शिवचनात सांगितले.या पूजेसाठी अकलूजसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून शिवभक्त बहुसंख्येने उपस्थित होते.पूजेची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.यावेळी वीरशैव लिंगायत समाज अकलूज यांचेकडून श्री.बृहन्मठ वेळापूर येथे वेद शास्त्राचे निवासी शिक्षण घेत असलेल्या बटूंना प्रोत्साहनपर विशेष सन्मान व आर्थिक मदत करण्यात आली.