अकलूजचा गावठी चाणक्य ‘ नावाच्या फेसबुक पेजवरून बदनामी
‘अकलूजचा गावठी चाणक्य ‘ नावाच्या फेसबुक पेजवरून बदनामी
संचार वृत्त अपडेट
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्याविषयी फेसबुकवरून बदनामीकारक आणि अपमानास्पद पोस्ट प्रसिद्ध केल्याप्रकरणी राहुल कोडग (रा. वेळापूर, ता. माळशिरस) यांनी अकलूज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
ही तक्रार २३ ऑक्टोबर रोजी पोलिसांकडे सादर करण्यात आली असून, ‘अकलूजचा गावठी चाणक्य’ नावाच्या फेसबुक पेजवरून गेल्या काही महिन्यांपासून मोहिते-पाटील आणि त्यांच्या कार्याशी संबंधित संस्थांविषयी खोट्या, दिशाभूल करणाऱ्या आणि मानहानीकारक पोस्ट प्रसिद्ध केल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अर्जदार राहुल कोडग यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या फेसबुक पेजवरून ४ जून २०२५ आणि १२ जानेवारी २०२५ रोजी काही संपादित फोटो आणि खोटा मजकूर प्रसारित करण्यात आला. या पोस्टद्वारे जयसिंह मोहिते-पाटील यांच्या सामाजिक आणि राजकीय प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. कोडग यांनी नमूद केले आहे की, ही कृती हेतूपुरस्सर पेजच्या वापरकर्त्यांचा शोध घेऊन, द्वेषातून प्रेरित असून, यामागे काही व्यक्तींचा कट आहे. फेसबुक त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी अर्जातून केली आहे.तक्रारीत पुढे म्हटले आहे की, या प्रकारामुळे जयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचला असून, भारतीय दंड संहिता कलम ४९९ आणि ५०० नुसार हा मानहानीचा गुन्हा ठरतो. तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत संबंधित दोषींना दंड किंवा कारावासाची शिक्षा होऊ शकते. अर्जदाराने फेसबुक लिंक व पेजचा तपास करून त्यामागील व्यक्ती ओळख पटवावी, तसेच दोषींविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.दरम्यान, तक्रार सादर करताना जयसिंह मोहिते-पाटील यांच्या समर्थकांची मोठी संख्या अकलूज पोलीस स्टेशन परिसरात उपस्थित होती. पोलीस स्टेशनच्या आवारात व बाहेरील परिसरात समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. अकलूज पोलिसांकडून या तक्रारीची प्राथमिक दखल घेतली असून, संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.



