अकलूजमध्ये २२ कर्तृत्ववान महिलांचा ‘नवदुर्गा पुरस्काराने’ सन्मान!

अकलूजमध्ये २२ कर्तृत्ववान महिलांचा ‘नवदुर्गा पुरस्काराने’ सन्मान!
संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नारीशक्तीचा गौरव करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंढरपूर जिल्हा संपर्क शाखेच्या वतीने अकलूज येथे ‘नवदुर्गा सन्मान सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात सामाजिक, सांस्कृतिक, व्यावसायिक, शैक्षणिक आणि कला क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या २२ कर्तृत्ववान महिलांना सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एम. के. इनामदार यांच्या हस्ते ‘नवदुर्गा पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.अकलूज येथील कृष्णप्रिया मल्टीफंक्शन हॉलमध्ये हा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजाच्या जडणघडणीत महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून, विविध क्षेत्रांत स्वतःच्या कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्कारामुळे सन्मानित महिलांच्या कार्याचा गौरव होण्याबरोबरच इतर महिलांनाही सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.

या कार्यक्रमाला जिल्हा संघचालक रमेश सिद, संपर्क प्रमुख प्रदीप कनाळ, राष्ट्रसेविका पंढरपूर समितीच्या श्रद्धा कुलकर्णी, स्मिता महामुनी,शाम भागवत, सुधीर नाचणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुरस्कारप्राप्त महिलांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मैत्रिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रदीप कनाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविकातून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर वक्त्या श्रद्धा कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात अनादिकालापासून भारतीय संस्कृतीमध्ये नारीशक्तीला असलेले महत्त्व विशद केले. समाजाच्या सर्वांगीण विकासात महिलांची भूमिका महत्त्वपूर्ण असून, त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणे ही काळाची गरज असल्याची भावना या सोहळ्यातून अधोरेखित झाली.
विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्या योगदानाचा गौरव करणारा हा सोहळा नारीशक्तीच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारा ठरला. नवरात्रोत्सवातील देवीच्या शक्तिस्वरूपाचे स्मरण करत समाजासाठी योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भक्ती नाचणे यांनी केले, तर धनश्री रीसवडकर यांनी आभार मानले.
या २२ महिलांना मिळाला ‘नवदुर्गा पुरस्कार’
पंढरपूर : ह.भ.प. सुप्रिया पंढरपूरकर, दीपली सतपाल.मंगळवेढा : तेजस्विनी कदम, डॉ. प्रीती शिर्के.सांगोला : वर्षा दौंडे, स्फूर्ती गाडे.
माढा : नीता देवकुळे, रुपाली बेंदगुडे.
करमाळा : रेश्मा गरड, मनीषा बोराडे.
नातेपुते : वैशाली दीक्षित, ऐश्वर्या देशपांडे.
खुडूस : सोनाली ठवरे.माळशिरस : शोभा वाघमोडे.गिरझणी : सई वाघ.अकलूज : गायत्री जामदार, विजया गुळवे, राजश्री केवाळे, ज्योती काकडे, शुभांगी देशमुख, अलका कदम,आरती ओतारी.आदी महिलांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ‘नवदुर्गा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.


