solapur

विठ्ठलराव शिंदे कारखान्याची पहिली उचल जाहीर 

विठ्ठलराव शिंदे कारखान्याची पहिली उचल जाहीर 

दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लढा यापुढेही सुरूच राहणार!

संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर) 

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काच्या दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उभारलेल्या आंदोलनाला आता सकारात्मक परिणाम मिळू लागला आहे. सुरुवातीला प्रतिटन २८०० रुपये असलेला ऊसदर आंदोलनाच्या रेट्यामुळे ३००० रुपयांपर्यंत पोहोचला आणि आता विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने सन २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी ऊस उत्पादकांना प्रतिटन ३१५० रुपये पहिली उचल देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची चर्चा माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात सुरू झाली आहे.विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना मर्यादित, युनिट क्रमांक १ पिंपळनेर, ता. माढा आणि युनिट क्रमांक २ करकंब, ता. पंढरपूर या दोन्ही युनिटचा सन २०२६-२७ चा गळीत हंगाम दि. १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झाला आहे. या हंगामात कारखान्याकडे ऊस गाळपासाठी पाठविणाऱ्या सभासद, बिगरसभासद तसेच ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना प्रतिटन ३१५० रुपये पहिली उचल अदा करण्यात येणार असल्याचे काढण्यात आलेल्या पत्रातून स्पष्ट झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळावा, उत्पादन खर्च आणि वाढती महागाई लक्षात घेऊन कारखान्यांनी ऊसदर जाहीर करावा, यासाठी संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाचा दबाव निर्माण करण्यात आला. सुरुवातीच्या २८०० रुपयांच्या दरातून ३००० रुपयांपर्यंत आणि आता ३१५० रुपयांपर्यंत झालेली वाढ ही शेतकऱ्यांच्या एकजुटीची आणि संघटनेच्या संघर्षाची फलश्रुती असल्याची भावना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

मात्र, ३१५० रुपये पहिली उचल जाहीर झाली म्हणजे शेतकऱ्यांच्या ऊसदराचा प्रश्न संपला, असे नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य आणि समाधानकारक दर मिळेपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.आंदोलनातून दरवाढीचा टप्पा गाठला असला, तरी शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी संघर्ष थांबणार नाही, असा स्पष्ट इशारा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी गळीत हंगामात ऊसदराचा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता असून, कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यातील दराची लढाई कोणते वळण घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button