• दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर व्याजासह शास्ती माफ करण्याची मागणी • नागरिक व व्यापाऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याचे आवाहन

• दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर व्याजासह शास्ती माफ करण्याची मागणी
• नागरिक व व्यापाऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याचे आवाहन
संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)
अकलूज शहरातील नागरिक आणि नगरपरिषद हद्दीतील व्यापारी सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या घरपट्टीवरील तसेच नगरपरिषद व्यापारी संकुलातील गाळेभाड्यावरील थकीत व्याज आणि शास्ती (दंडात्मक आकार) पूर्णपणे माफ करून अकलूजकरांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपचे अकलूज शहर सरचिटणीस अमोल माने यांनी नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे. नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना दिलेल्या या निवेदनात राज्यातील दुष्काळी परिस्थिती, नागरिकांची आर्थिक ओढाताण आणि व्यापाऱ्यांसमोरील अडचणी याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
यंदा पावसाने ओढ दिल्याने आणि दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये जनजीवनावर परिणाम झाला आहे. राज्य सरकारनेही दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली असून, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि व्यापारी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. या परिस्थितीचा परिणाम अकलूज शहरातील सर्वसामान्य नागरिक आणि लहान-मोठ्या व्यावसायिकांवरही होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दैनंदिन उदरनिर्वाहाचा खर्च भागविणेही अनेकांसाठी आव्हानात्मक बनले आहे. अशा वेळी घरपट्टी आणि गाळेभाड्याची थकबाकी भरताना त्यावर आकारण्यात येणारे व्याज व दंड नागरिकांच्या अडचणींमध्ये आणखी भर घालणारे ठरत आहेत. त्यामुळे सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीचा विचार करून नगरपरिषदेने सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा, अशी भूमिका अमोल माने यांनी मांडली आहे.निवेदनानुसार, सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँका व माफक कर्जपुरवठ्याशी संबंधित वसुलीबाबत काही सूचना दिल्याचा संदर्भ देत, त्याच धर्तीवर नगरपरिषद प्रशासनानेही नागरिकांच्या अडचणींचा विचार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळू शकतो, असेही निवेदनात म्हटले आहे.नागरिकांवरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी आणि सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देत या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी अपेक्षा अमोल माने यांनी व्यक्त केली आहे.यावेळी अमोल माने सरचिटणीस अकलूज शहर, विक्रम गायकवाड उपाध्यक्ष, अकलूज शहर जतिन वायदंडे, युवा मोर्चा अकलूज शहर,समर कोतमिरे,शाहबाझ काझी आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.आता या मागणीवर अकलूज नगरपरिषद प्रशासन काय निर्णय घेते, याकडे शहरातील नागरिक आणि व्यापारी वर्गाचे लक्ष लागले आहे.


