solapur

राजू शेट्टींच्या दौऱ्याने ऊस दर आंदोलनाला मिळणार धार ! स्वाभिमानीच्या बैठकीत ३५००/- रुपये पहिल्या उचलीचा निर्धार उचली शिवाय माघार नाही

राजू शेट्टींच्या दौऱ्याने ऊस दर आंदोलनाला मिळणार धार !

स्वाभिमानीच्या बैठकीत ३५००/- रुपये पहिल्या उचलीचा निर्धार उचली शिवाय माघार नाही

संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर) 

 ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला योग्य आणि रास्त दर मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुन्हा एकदा संघर्षाची तयारी सुरू केली आहे. यंदाच्या गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल म्हणून प्रतिटन ३५०० रुपये मिळालेच पाहिजेत, या प्रमुख मागणीसाठी संघटना आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संघटनेच्या संपर्क कार्यालयात (ता.माळशिरस) विझोरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.या बैठकीत आगामी ऊस दर आंदोलनाची दिशा, शेतकऱ्यांची भूमिका, कारखानदारांकडून मिळणारा ऊस दर आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यंदाचा गळीत हंगाम सुरू होत असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी योग्य दर पडणे गरजेचे आहे. ऊस उत्पादनासाठी लागणारा वाढता खर्च, खते, औषधे, मजुरी, मशागत, पाणी आणि वाहतूक यांचा वाढलेला खर्च पाहता सध्याच्या परिस्थितीत

शेतकऱ्यांना अपेक्षित मोबदला मिळणे आवश्यक असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांचा लवकरच सोलापूर जिल्हा दौरा होणार असून, या दौऱ्याच्या माध्यमातून ऊस दराच्या प्रश्नाला अधिक व्यापक स्वरूप देण्याची तयारी संघटनेने सुरू केली आहे. राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधून आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील ऊस दराच्या आंदोलनाला नवी ऊर्जा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

• ३५००/- रुपये दरासाठी ठाम निर्धार 

यंदाच्या हंगामात कोणत्याही परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल प्रतिटन ३५०० रुपये मिळावी, यासाठी संघटना ठाम भूमिका घेणार आहे. केवळ आश्वासनांवर समाधान न मानता शेतकऱ्यांच्या हक्काचा दर मिळवून देण्यासाठी संघटितपणे लढा उभारण्याची गरज बैठकीत अधोरेखित करण्यात आली

(अजित बोरकर स्वाभिमानी शेतकरी संघटना) 

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या उसाला योग्य दर मिळविण्यासाठी एकजूट दाखवावी. कारखानदारांच्या निर्णयाकडे केवळ प्रेक्षक म्हणून न पाहता आपल्या हक्कासाठी सज्ज राहावे. आगामी काळात संघटनेच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले.
सोलापूर जिल्हा हा ऊस उत्पादन आणि साखर कारखानदारीच्या दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातील ऊस दराचा प्रश्न शेतकरी आणि कारखानदार या दोघांसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. अशा परिस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ३५०० रुपये पहिली उचल मिळविण्याचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत आंदोलनाची तयारी सुरू केल्याने आगामी काळात ऊस दराचा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीतून संघटनेने आगामी लढ्याचे संकेत दिले असून, आता राजू शेट्टी यांच्या सोलापूर दौऱ्याची आणि त्यानंतर जाहीर होणाऱ्या आंदोलनाच्या भूमिकेची शेतकरी वर्गाला उत्सुकता लागली आहे. ऊस उत्पादकांच्या हक्काच्या दरासाठी यंदा स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणती भूमिका घेणार आणि या लढ्याला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा किती मोठा प्रतिसाद मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी बैठकीस जिल्हाध्यक्ष तानाजी बागल ज्येष्ठ नेते मगन काळे,जिल्हा संघटक शहाजन शेख, तालुकाध्यक्ष अजित बोरकर, दत्ता भोसले, माजी सरपंच तुकाराम ठवरे, रामचंद्र काळे,धनाजी डोंबाळे, राजाराम बोरकर, संभाजी ठवरे, नेमचंद शिंदे,विलास काळे, यासह पदाधिकारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button