५२ वर्षे अविरत सेवा !प्रमोद कुलकर्णींचा होणार गौरव

५२ वर्षे अविरत सेवा !प्रमोद कुलकर्णींचा होणार गौरव
प्रेरणादायी वाटचाल
संचार वृत्त अपडेट
वृत्तपत्र म्हणजे केवळ कागद नाही, तर ती समाजाशी नाळ जोडणारी सेवा आहे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे अकलूज येथील ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते प्रमोद कुलकर्णी. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी त्यांनी स्वीकारलेली वृत्तपत्र वाटपाची वसाहत तब्बल 52 वर्षे अविरतपणे सांभाळल्याबद्दल त्यांचा ‘दैनिक पुण्यनगरी’ परिवारातर्फे विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
‘भूमिपुत्रांचा सन्मान कर्तुत्वाचा’ या पुण्यनगरी पुरस्कृत अभियानांतर्गत हा सन्मान प्रदान केला जाणार आहे. १५ व्या वर्षी हाती घेतलेले काम आज वयाच्या ६६ व्या वर्षीही तितक्याच निष्ठेने, तितक्याच शिस्तीने ते पार पाडत आहेत. पाऊस असो, ऊन असो किंवा वादळ, ५२ वर्षांत त्यांनी एकही दिवस वृत्तपत्र वाटपात खंड पडू दिला नाही.
त्यांच्या या अखंड सेवेची, प्रामाणिकपणाची आणि कर्तव्यनिष्ठेची दखल घेत दैनिक पुण्यनगरी परिवाराने त्यांना विशेष पुरस्काराने गौरवण्याचा निर्णय घेतला आहे. कष्टकरी, सामान्य माणसांच्या कर्तुत्वाला व्यासपीठ देणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
प्रमोद कुलकर्णी यांच्या या सन्मानामुळे अकलूजकरांच्या मनात त्यांच्याविषयीचा आदर अधिकच द्विगुणित झाला आहे. सकाळी वेळेवर वृत्तपत्र हातात देणे ही त्यांच्यासाठी केवळ व्यवसाय नसून, वाचकांशी बांधलेली नाळ आहे.
वडिलांच्या अकाली निधनानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी आली. शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी कुलकर्णी ब्रदर्स न्यूजपेपर एजन्सी सुरू केली.
सकाळी 4 वाजता पेपर आणणे, गावोगावी सायकलवर वाटप करणे, दुपारी शेती सांभाळणे आणि संध्याकाळी परत एजन्सीचे हिशोब ही त्यांची दिनचर्या ५० वर्षे अखंड सुरू आहे.
पेपर विकून फक्त पोट भरलं नाही तर कुटुंबाला समाजात मान मिळवून दिला असे ते आजही अभिमानाने सांगतात.समाजकारण आणि राजकारणातील लढा अण्णा म्हणजे फक्त पेपर विक्रेते नाहीत, तर अकलूजच्या सामाजिक जाणिवेचा आवाज आहेत.ग्रामपंचायत निवडणूक: सामान्य घरातून येऊन प्रस्थापित नेत्यांना आव्हान दिले होते.राजकीय विरोधामुळे जीवघेणा हल्ला झाला. खोट्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न झाला. त्या काळात घराबाहेर पडणेही मुश्किल होते. शेजारी-पाजारी हळदी-कुंकाला सुद्धा बोलावत नव्हते.पण कोणत्याही संकटापुढे झुकलो नाही. सत्य आणि लोकांचा विश्वास हेच माझे भांडवल ही त्यांची भूमिका होती.
या लढ्यात पत्नी सौ.मेघा कुलकर्णी ढाल बनून पाठीशी उभ्या राहिल्या. दत्ता वाघमारे, दत्ता पवार, सुनील वायकर यांसारख्या मित्रांनी त्या काळात दिलेला आधार कधीच विसरणार नसल्यानचे त्यांनी सांगितले.
कोरोना काळापूर्वी अकलूज व परिसरात ९००० पेपर विक्री होत होती. २४ मुले वाटपासाठी होती. कुलकर्णी ब्रदर्स’ हे नाव म्हणजे विश्वासाचे दुसरे नाव होते. एक वर्ष पेपर बंद. एजन्सी बंद पडण्याच्या मार्गावर. पण कुलकर्णी थांबले नाहीत. लॉकडाऊन नंतर घरोघरी जाऊन लोकांना विनंती केली. पेपर बंद करू नका ही आपली सवय आहे, ही आपली आरोग्याची गरज आहे.” त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक वाचक पुन्हा पेपरकडे वळले.एजंट हा कंपनीचा गडी नाही, तर ब्रँडचा राजदूत आहे. त्याला सन्मान द्या ही त्यांची वरिष्ठांकडे आग्रहाची भूमिका आहे.वर्षांहून अधिक काळ सामाजिक,राजकीय क्षेत्रात काम केले. अनेक चढ-उतार पाहिले. पण “तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही” याचेच समाधान आहे.
पुरस्काराबद्दल बोलताना ते गहिवरतात, “हा सन्मान माझ्या एकट्याचा नाही. माझ्या कुटुंबाचा, मित्रांचा आणि गेली 50 वर्षे माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक वाचकाचा आहे. सर्वशक्तिमान परमेश्वराच्या कृपेने हा प्रवास पूर्ण झाला.आम्ही निवृत्त झालो, मुले मोठी झाली, पण सकाळी दारावर पेपर देणारा अण्णा तसाच आहे. त्यांच्या वेळेची शिस्त आम्हाला घड्याळापेक्षा पक्की वाटते.कोरोनात सगळे घाबरले होते, पण कुलकर्णी मास्क घालून पेपर द्यायचे.असे पेपर वाचक बोलत आहेत.



