‘सुदृढ पिढी हेच देशाचे उज्ज्वल भविष्य’ ; नशिर सय्यद,भविष्य वक्ते

‘सुदृढ पिढी हेच देशाचे उज्ज्वल भविष्य’ ; नशिर सय्यद,भविष्य वक्ते
संचार वृत्त अपडेट
अकलूज येथील स्थानिक आरोग्य केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पल्स पोलिओ’ लसीकरण शिबिराचे अत्यंत उत्साही वातावरणात उद्घाटन करण्यात आले. या शिबिराचे औपचारिक उद्घाटन अकलूज येथील प्रसिद्ध कृष्णमूर्ती पद्धतीचे गाढे अभ्यासक आणि नामांकित भविष्यवक्ते नशीर सय्यद यांच्या शुभहस्ते एका लहान बालकाला पोलिओचा डोस पाजून करण्यात आले.
देशातून पोलिओचे पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी आणि बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेला अकलूजमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी बोलताना मुख्य अतिथी नशीर सय्यद यांनी पोलिओ मोहिमेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “लहान मुले हे आपल्या देशाचे भविष्य आहेत. आजचे आरोग्यदायी बालक उद्याचा सशक्त नागरिक घडवणार आहे. त्यामुळे एकाही बालकाला या डोसपासून वंचित न ठेवता पालकांनी जबाबदारीने आपल्या ५ वर्षांखालील सर्व मुलांना पोलिओचा डोस पाजावा.”
या उद्घाटन प्रसंगी स्थानिक आरोग्य विभागाचे अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या ठिकाणी पोलिओ डोस सुरक्षित ठेवण्यासाठीची विशेष पेटी (व्हॅक्सिन करिअर) आणि इतर आवश्यक साहित्याची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. पहिल्याच दिवशी परिसरातील अनेक पालकांनी आपल्या लहान मुलांना आणून पोलिओ डोस दिला. आरोग्य प्रशासनाच्या वतीने ही मोहीम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेण्यात येत आहेत.


