solapur

माणकीत साकारली ‘गोकुळनगरी’; रणनवरे परिवाराचा श्रीकृष्ण लीलांचा मनमोहक देखावा !

माणकीत साकारली ‘गोकुळनगरी’; रणनवरे परिवाराचा श्रीकृष्ण लीलांचा मनमोहक देखावा !

संचार वृत्त अपडेट   (लक्ष्मीकांत कुरुडकर)

माळशिरस तालुक्यातील माणकी येथे रणनवरे परिवाराच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला यंदाही मोठ्या उत्साहात उजाळा देण्यात आला आहे. मधुकर  रणनवरे, संगीता रणनवरे, त्यांचे सुपुत्र  विनोद रणनवरे व  काजल रणनवरे (रणनवरे सह परिवार) यांच्या संकल्पनेतून ‘गोकुळनगरी’ हा आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे.या देखाव्यामध्ये राधा-कृष्ण आणि गोकुळनगरीतील श्रीकृष्णाच्या विविध बाललीला अत्यंत सुंदर पद्धतीने साकारण्यात आल्या आहेत. कृष्ण जन्माच्या वेळी यमुना नदी पार करताना श्रीकृष्णाचे झालेले दर्शन, यमुना नदीमध्ये शेषनाग व कालियानागाच्या मस्तकावर श्रीकृष्ण नृत्य करत असल्याचा प्रसंग, तसेच बालकृष्णाचे लोणी चोरून खातानाचे दृश्य आणि त्याच्या मागे हातात काठी घेऊन धावणारी यशोदा माता, असे अनेक प्रसंग या देखाव्यातून जिवंत करण्यात आले आहेत.

याशिवाय गवळण माखन घेऊन जात असल्याचे दृश्य तसेच हातात वीणा घेतलेली मीराबाई यांचे दर्शनही या गोकुळनगरीत घडते. त्यामुळे हा देखावा केवळ सजावट न राहता श्रीकृष्णाच्या बाललीला, भक्ती, संस्कृती आणि पारंपरिक जीवनपद्धतीचा सुरेख संगम ठरला आहे.

रणनवरे परिवाराने गेल्या दहा वर्षांपासून ही परंपरा सातत्याने जपली असून, दरवर्षी पारंपरिक सण-उत्सवाच्या माध्यमातून धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. बदलत्या काळात पारंपरिक सणांचे महत्त्व कायम ठेवत नवनवीन संकल्पना आणि आकर्षक देखाव्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपण्याचे काम या परिवाराकडून केले जात आहे.
यंदाच्या ‘गोकुळनगरी’मध्ये श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंगांचे करण्यात आलेले सजीव चित्रण लक्षवेधी ठरत असून, भक्ती, कला, परंपरा आणि कुटुंबीयांचा सहभाग यामुळे माणकीतील रणनवरे परिवाराची दहा वर्षांची ही परंपरा विशेष ठरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button