मेडद च्या गावातून राष्ट्रीय कंपनी पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास योगेश चव्हाण यांचा राम सातपुते यांच्या हस्ते सन्मान अभियांत्रिकीच्या शिक्षणातून अधिकारी

मेडद च्या गावातून राष्ट्रीय कंपनी पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
योगेश चव्हाण यांचा राम सातपुते यांच्या हस्ते सन्मान अभियांत्रिकीच्या शिक्षणातून अधिकारी
संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)
माळशिरस तालुक्यातील मेडद येथील रहिवासी योगेश चव्हाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. भारत सरकारच्या नॅशनल केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) या सार्वजनिक क्षेत्रातील नामांकित कंपनीमध्ये मटेरियल मॅनेजमेंट ऑफिसर या अधिकारीपदावर त्यांची निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे मेडद गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

चव्हाण यांचे वडील विष्णू चव्हाण हे शेतकरी असून आईचे नाव छाया चव्हाण आहे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या योगेश यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उच्च शिक्षण पूर्ण केले आणि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर केंद्र सरकारच्या अखत्यारितील नामांकित कंपनीत अधिकारीपद मिळविले आहे. त्यामुळे त्यांच्या यशाचे विशेष कौतुक होत आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी शिक्षणातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. त्यांनी डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट, पिंपरी, पुणे येथे आपले अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा योग्य उपयोग करून करिअरमध्ये सातत्याने प्रगती केली. त्यातूनच त्यांची नॅशनल केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL), भारत सरकार यांच्याकडील मटेरियल मॅनेजमेंट ऑफिसर पदासाठी निवड झाली.योगेश चव्हाण यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मा.आ.राम सातपुते यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी योगेश चव्हाण यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मेडद ग्रामस्थांच्या वतीने चव्हाण कुटुंबीयांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. आपल्या गावातील सुपुत्राने मिळविलेल्या यशाचा आनंद ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला. यावेळी ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार आणि मान्यवरांची उपस्थिती होती.

विष्णू चव्हाण हे शेती व्यवसायाशी जोडलेले असताना त्यांच्या मुलाने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून राष्ट्रीय पातळीवरील कंपनीमध्ये अधिकारी म्हणून मिळविलेली संधी ही चव्हाण कुटुंबासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थीही मेहनत, सातत्य आणि गुणवत्तेच्या जोरावर मोठ्या संधी मिळवू शकतात, याचे उदाहरण योगेश चव्हाण यांच्या यशातून समोर आले आहे.त्यांच्या यशामुळे मेडद गावातील विद्यार्थी व युवकांनाही प्रेरणा मिळाली असून, शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या गावाचे नाव मोठ्या स्तरावर नेण्याची उमेद निर्माण झाली आहे.
शेतकरी कुटुंबातील संस्कार, उच्च शिक्षण, मेहनत आणि सातत्य यांच्या जोरावर चव्हाण यांनी मिळविलेली ही यशस्वी झेप निश्चितच मेडद गावासाठी अभिमानाची आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरली आहे.



