solapur

जानकारांची नवी राजकीय दिशा ? गोरे,सातपुते यांच्या उपस्थितीने राजकीय वर्तुळात चर्चेला वेग !

जानकारांची नवी राजकीय दिशा ? गोरे,सातपुते यांच्या उपस्थितीने राजकीय वर्तुळात चर्चेला वेग !

मोहिते पाटील अध्यायानंतर जानकर यांचा भाजपकडे कल ?

 संचार वृत्त अपडेट   (लक्ष्मीकांत कुरुडकर)

सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय पटावर उत्तमराव जानकर यांच्या अलीकडील राजकीय हालचालींमुळे नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. मोहिते-पाटील आणि जानकर यांच्यातील राजकीय संबंधांमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या मतभेदानंतर आता जानकरांची भाजप नेत्यांशी वाढती जवळीक लक्ष वेधून घेत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत उमेदवारीच्या मुद्द्यावरून जानकरांनी मोहिते-पाटील यांच्यावर विश्वासघाताचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. या घडामोडीनंतर जानकरांची पुढील राजकीय भूमिका काय असेल, याबाबत सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
याच पार्श्वभूमीवर माण तालुक्यातील बोराटवाडी येथे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानी विराजमान असलेल्या श्री गणरायाची उत्तमराव जानकर यांनी आरती केली. यावेळी भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांचीही उपस्थिती होती. त्यामुळे या भेटीची राजकीय चर्चेत विशेष नोंद घेतली जात आहे.
गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर जानकर यांनी सोलापूर जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या शेतीच्या संकटाबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा केली. दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या भागातील पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच माळशिरस तालुक्यातील लोडशेडिंगचा प्रश्न सोडवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणीही त्यांनी केली.
विधान परिषद निवडणुकीनंतर जानकर महायुतीच्या बैठकीला उपस्थित राहिले आणि भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यानंतर आता भाजपच्या प्रमुख नेत्यांशी त्यांच्या वाढत्या संपर्कामुळे त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.
मात्र, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानी गणरायाची आरती करण्यासाठी झालेली ही भेट म्हणजे राजकीय आघाडी किंवा भाजपमध्ये प्रवेशाचे अधिकृत संकेत आहेत, असे सध्या निश्चितपणे म्हणता येणार नाही. ही भेट धार्मिक कार्यक्रम आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील चर्चेपुरतीही असू शकते. त्यामुळे जानकरांच्या या भेटीकडे सध्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, आगामी काळातील त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button