“धन्यवाद मुंढे साहेब…! देशमुख कुटुंबाचा गौराई देखाव्यातून दूध भेसळमुक्तीचा संदेश!

“धन्यवाद मुंढे साहेब…! देशमुख कुटुंबाचा गौराई देखाव्यातून दूध भेसळमुक्तीचा संदेश!
संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)
अकलूजमधील अनुजा देशमुख यांच्या घरी यंदा गौरी-गणपतीच्या चरणी सामाजिक प्रबोधनाचा एक अनोखा आणि धडाकेबाज ‘मुंढे पॅटर्न’ अवतरला आहे. देशमुख परिवाराने आपल्या प्रबोधनात्मक देखाव्याचे ७ वे वर्ष साजरं करताना, समाज आरोग्याशी निगडित असलेल्या दूध भेसळीच्या ज्वलंत प्रश्नावर थेट भाष्य केलंय. ग्रामीण घराच्या सारवलेल्या अंगणात, साक्षात गौराई दूध उत्पादक शेतकऱ्याच्या रुपात अवतरल्याचा प्रसंग प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय. भेसळमुक्त दुधावर कारवाई करुन, दूध उत्पादक शेतकऱ्याच्या कष्टाला न्याय देणारे धडाडीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे आणि एफडीए (FDA) प्रशासनाप्रती या देखाव्यातून मोठी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.
आपल्या दुधाची शुद्धता राखल्याबद्दल मुखात हार घेऊन मुंढे साहेबांचे आभार मानणारी गाय आणि सोबतीला उभी असलेली शेतकरी महिला, प्रशासकीय जरबेमुळे बळीराजाच्या घरात आलेली समृद्धी हुबेहूब जिवंत करतात. धार्मिक परंपरेला सामाजिक भान आणि कर्तव्यदक्ष शासकीय मोहिमेची जोड देणारा हा राज्यातील एक अत्यंत संवेदनशील आणि कौतुकास्पद देखावा ठरला आहे.”भेसळखोरांमुळे मातीमोल झालेल्या खऱ्या दुधाला कर्तव्यदक्ष प्रशासकीय कारवाईमुळे आज योग्य किंमत मिळाली आहे. एका मुक्या जनावराचे वात्सल्य, दूध उत्पादक शेतकऱ्याचे कष्ट आणि कायद्याचे रक्षक यांच्यातील कृतज्ञतेचा हा जिवंत सोहळा आहे; ज्याची साक्ष स्वतः गौराई हातात शुद्ध दुधाची किटली घेऊन देत आहेत !
• दुष्काळाचे सावट दूर व्हावे
दूध भेसळीविरोधातील कडक कारवाईमुळे शुद्ध दुधाची मागणी वाढली आहे आणि याचा थेट व न्याय्य फायदा प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळावा आणि राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर व्हावे ही यंदाच्या गौरी गणपती चरणी प्रार्थना. अनुजा देशमुख



