solapur

ये आई!! तू मलापोटातच मारून टाक…!!

ए आई !! तू मला पोटातच मारून टाक….!!

संचार वृत्त 

आई!! अगं आई!! अगं मी तुलाच आवाज देते, अगं मला तुझ्याशी थोडसं बोलायचं आहे, ऐक ना पूर्वी मी तुला काय म्हणायचे ते आठवतं का गं..!! की मला हे सुंदर जग बघायचे आहे. मला या जगामध्ये बागडायचं आहे. तुझ्यासोबत आणि बाबांसोबत अंगा खांद्यावर खेळायचे आहे तू मला जन्म दे असा मी सारखा तुझ्याकडे हट्ट करायचे !!
पण…… आज मी तुला थोडं वेगळं सांगणार आहे ,तुला वाईट वाटेल पण आई..!! मी हे माझे शब्द मागे घेते. तू मला जन्म देण्या अगोदरच मारून टाक कारण मला हे असलं वाईट जग नाही बघायचंय !! की ज्या जगामध्ये येण्यासाठी मी तुझ्याकडे हट्ट केला होता ते जग मुलींसाठी एवढं वाईट असेल याची कल्पना मला ही नव्हती. पण आता दररोज एक नवीन बहिणी सोबत होत असलेला अत्याचाराला मी कंटाळली आहे….
अगं आई !! या जगामध्ये मुलीवर अत्याचार करताना तिचं वय, तिचा पेशा काहीच पाहिलं जात नाहीये गं..!! तिचा जीव जाईल इतपत तिच्यावरती बलात्कार आणि अत्याचार केला जातोय. आणि याची कटाक्षाने जाणीव होतेय की या जगामध्ये लहान मुली पासून ते वयस्कर स्त्रियांपर्यंत ती सुरक्षित नाही आणि तिला तडफडून मरायचं जर असेल तर या जगामध्ये न आलेलच बरं कि गं !! मला माहिती आज ही परिस्थिती बघून ज्या घरामध्ये मुलगी नाही त्या घरातील आईंना वाटतं बरं झालं मला मुलगी नाही झाली.. आई मी जर जन्माला आले असते तर मीही तुझ्या आणि बाबांच्या आयुष्यातील काळजी म्हणून राहिले असते ना गं …. पालकांना प्रत्येक क्षणोक्षणी आपल्या मुलीची काळजी वाटते. आई थोडा विचार करून बघ त्या स्त्रीच्या जागी त्या मुलीच्या जागी जर मी असते तर……… हा विचार जरी केला तरी मला असह्य होतं माझ्या अंगावरती काटा येतो, मन अस्वस्थ होतं, बेचैन होतं आणि क्षणात वाटतं की आपण या जगात जायलाच नको.!! मी या जगात सुरक्षितच नसेल तर या जगामध्ये जाण्यात अर्थातच नाही..!! मी आनंदाने राहू शकणार नाही, बागडू शकणार नाही ,कोणतेही काम आनंदाने मी करू शकणार नाही ,सतत माझ्या मनामध्ये भीती राहील. मला असलं जीवन जगायचं नाही मला माहिती की मी या जगामध्ये न आल्याने पुढची पिढी जन्माला येईल की नाही हे माहित नाही. परंतु आई जग एवढं पुढे गेलेल आहे की वैज्ञानिक दृष्ट्या मूल जन्माला पण घातली जातील ..पण त्यात मुलगी असेल की नाही हे माहित नाही … म्हणून आई मी माझे शब्द मागे घेतेय आणि मी तुला स्वतःहून सांगते आई तू मला पोटातच मारून टाक या जगात येऊन क्षणोक्षणी मरण्यापेक्षा एकदाच पोटात श्वास बंद झालेला बरा……..

तुझीच लाडकी लेक….

प्रा.सौ.शितल संजय जाधव (शिंदे)
शंकरराव मोहिते महाविद्यालय
अकलूज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button