गोविंदराव नाचणे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोफत आयुर्वेदिक सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन
श्री ब्रह्मचैतन्य श्रीराम मंदिर संग्रामनगर येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन.
संचार वृत्त
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
संग्रामनगर (ता.माळशिरस) येथील श्री ब्रह्मचैतन्य श्रीराम मंदिर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवानिमित्त व स्व.गोविंदराव मार्तंड नाचणे यांच्या पुण्यतिथी निमित्त रविवारी २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मोफत आयुर्वेदिक सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटन अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मदनसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते व पंचायत समिती माजी सदस्य सुर्यकांत माने शेंडगे,डॉ.प्रशांत निंबाळकर व सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सत्संग मंडळाचे विश्वस्त व सभासद यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या शिबिरासाठी डॉ.पुष्कर हर्षवर्धन नाचणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील तज्ञ डॉक्टरांकडून सर्व प्रकारच्या आजारांची तपासणी करून मोफत औषधोपचार दिले जाणार आहेत.या शिबीराचा सर्व गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा असे अवाहन या शिबिराचे मुख्य संयोजक हर्षवर्धन नाचणे व डॉ.पुष्कर नाचणे यांनी केले असून त्यांना या शिबिरात पुणे येथील डॉ.अक्षदा भांडवले, डॉ.रश्मी जोशी,डॉ.भिमाशंकर उपासे,डॉ.दिव्या शिवा,डॉ.रविंद्र सिंह,डॉ.योगिनी भोयर हे तज्ञ डॉक्टर वैद्यकीय सेवा देणार असून या शिबिरासाठी विश्वस्त मंडळ,सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सत्संग मंडळ संग्रामनगर याचे सहकार्य मिळणार आहे.या विश्वस्त मंडळाच्या वतीने आजपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन,सामाजिक उपक्रम समाजाच्या हिताच्या उपक्रम राबविण्यात आलेले आहेत.
२६ ऑगस्ट रोजी श्री ब्रह्मचैतन्य श्रीराम मंदिर संग्रामनगर येथे श्रीकृष्ण जन्मोत्सवनिमित्त पहाटे ५ ते ६ या वेळेत श्रीं ची काकड आरती, सकाळी ६ ते ७:३० वाजता श्रीं ना रूद्राभिषेक,अखंड नामस्मरण व रात्री ९ ते १२ यावेळेत सुप्रसिद्ध श्रीराम कृपा भजनी मंडळाचा सुश्राव्य भजन,भारूड, गवळणी,दांडीया नृत्य कार्यक्रम होणार असून रात्री १२ वाजता पुष्पवृष्टीने श्रीकृष्ण जन्मोत्सव संपन्न केला जाणार असून मंदिराच्या परंपरा प्रमाणे प्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
तरी श्रीकृष्ण जन्मोत्सवा साठी व प्रसादासाठी सर्व भाविकांनी उपस्थित राहून भगवान श्रीकृष्ण सेवेचा लाभ घ्यावा असे अवाहन श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सत्संग विश्वस्त मंडळाच्या वतीने अध्यक्ष काशिनाथ डांगे गुरूजी यांनी केले आहे.