भाजपकडून नगरपालिकेसाठी स्वबळाचा नारा प्रदेशकडून एबी फॉर्म जिल्हाध्यक्षांकडे सुपूर्द

भाजपकडून नगरपालिकेसाठी स्वबळाचा नारा प्रदेशकडून एबी फॉर्म जिल्हाध्यक्षांकडे सुपूर्द
संचार वृत्त अपडेट
जिल्ह्यात होत असलेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष स्वबळावर कमळ या चिन्हावर लढविणार आहे. निवडणुकी संदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय येण्याचा अधिकार पक्षाने दिला आहे. प्रोटोकॉल म्हणून तशी कल्पना प्रदेश भारतीय जनता पक्षाला देण्यात आली आहे. जिल्ह्यातील निवडणुकीचे एबी फॉर्म पक्षाने आपल्याकडे सुपूर्द केले आहेत, अशी माहिती सोलापूर जिल्हा भारतीय जनता पक्ष पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यातील अक्कलकोट, अकलूज, बार्शी, दुधनी, करमाळा, कुडुवाडी, मैंदर्गी, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला या नगरपालिकांसह अनगर नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इतर पक्षातील कार्यकर्त्यांचे इन्कमिंग झाले आहे. असे असले तरी मूळ भारतीय जनता पक्षाच्या तरुण कार्यकर्त्यांना निवडणुकीत उमेदवारी देताना प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे. पक्षातील नव्या चेहऱ्यांना या निवडणुकीत संधी देण्यात येणार आहे. उमेदवारी देताना भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांसह नवीन पक्षात आलेल्या नेते, कार्यकर्त्यांसोबतही चर्चा करण्यात येणार आहे. मात्र निवडणुकीत निवडून येण्यास सक्षम. ही पात्रता अंतिम राहणार असल्याचे उमेदवारी संदर्भात बोलताना चव्हाण यांनी सांगितले.
बुधवारी मुंबई येथील भेटी दरम्यान प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह आपल्या पक्ष संघटनेतील इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी भेटी झाल्या मात्र या भेटीदरम्यान माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. या भेटीत नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकी शिवाय कोणताही विषय झाला नसल्याची माहिती जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी दिली.
मित्र पक्षाची राजकीय कोंडी
भारतीय जनता पक्षाने स्वबळाचा नारा दिल्याने मित्रपक्ष असणाऱ्या अजित राष्ट्रवादीसह एकनाथ सेनेच्या कार्यकत्यांची या निर्णयाने निवडणुकीच्या तोंडावर मोठी राजकीय कोंडी झाली आहे. या मित्र पक्षांची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



