इच्छुकांचे गुडघ्याला बांशिंग… तर नेत्यांचे श्रद्धा और सबुरीचे संकेत !

इच्छुकांचे गुडघ्याला बांशिंग… तर नेत्यांचे श्रद्धा और सबुरीचे संकेत !
इच्छुकांचे मात्र मोहिते पाटलांच्या आगामी राजकीय भूमिकेवर लक्ष
संचार वृत्त अपडेट
अकलूज शहरात नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आखाड्यात अनेक इच्छुक उमेदवारांनी आता आपले राजकीय बस्तान बसविण्यासाठी त्यांना सध्या माणुसकीचा पाझर फुटलेला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील गल्लीबोळातील अनेक हॉटेलातही सध्या ‘चाय पे’ चर्चा रंगताना दिसून येत आहे. नगराध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार हे सध्या पडद्याआडून आपले राजकीय जुगाड बसविण्यात दंग झालेले आहेत. त्यांचे कार्यकर्ते आपल्या नेत्यांची राजकीय आखाड्यात टिमकी वाजवत आहेत.
नेतेमंडळी आता मतदारांचा कानोसा घेऊन जनमत मागे असलेल्या उमेदवारांची पडताळणी करून चाचपणी करताना राजकीय फडात मग्न झाले आहे. अकलूज नगरपरिषद निवडणुकीसाठी १३ प्रभागात महायुती आणि महाविकास आघाडीकडे इच्छुकांची मोठी भाऊगर्दी झालेली असली तरी जनाधार असलेल्या उमेदवारांच्या संपर्कात राजकीय नेते मंडळी आहेत. निवडणुकीत मोहिते पाटील यांची राजकीय भूमिका गुलदस्त्यात असली तरी इच्छुक मात्र मोहिते पाटलांच्या आगामी राजकीय भूमिकेवर लक्ष ठेवून आहेत.मतदारांची चाचपणी आणि उमेदवारांचा जनाधार ओळखण्यासाठी अकलूज शहरात स्वतंत्र यंत्रणा सध्या मतदारांचा व्होरा ओळखण्यात मग्न झालेली दिसून येत आहे. जनाधार असलेल्या मात्तबर नेतेमंडळीना नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत राजकीय फडात उतरविण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून जोर दिला जात आहे. बंडोबांना थंडोबा करण्यासाठी नेतेमंडळी सध्या साईबाबांच्या श्रद्धा और सबुरीचा मंत्र जपत मनधरणी करून थांबा आणि पहाच्या भूमिकेत असल्यामुळे इच्छुक मंडळी सध्या राजकीय आखाड्यातील खेळ निमूटपणे पाहताना दिसून येत आहे.



