अकलूजमध्ये दसऱ्याच्या सोनेवाटपातून दिसला जिव्हाळ्याचा वारसा!

अकलूजमध्ये दसऱ्याच्या सोनेवाटपातून दिसला जिव्हाळ्याचा वारसा!
संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)
दसरा म्हणजे विजयाचा, मांगल्याचा आणि परस्परांतील प्रेम व आपुलकी वृद्धिंगत करण्याचा सण. या दिवशी आपट्याची पाने एकमेकांना देत सोनं लुटण्याची परंपरा जपली जाते. मात्रअकलूज येथील अकलाई देवी मंदिरात व धवल श्रीराम मंदिर येथे विजयादशमीच्या निमित्ताने घडलेल्या एका भावस्पर्शी प्रसंगाने या परंपरेला नात्यातील जिव्हाळ्याची अनोखी किनार लाभली. एका ज्येष्ठ नागरिकाने महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांना आपट्याची पाने देत शुभेच्छा दिल्या.
छायाचित्र–संजय लोहकरे
या प्रसंगातून श्रद्धा, जिव्हाळा, आपुलकी आणि प्रेमाचे दर्शन घडले.विजयादशमीच्या निमित्ताने अकलूज येथील अकलाई देवी मंदिरात सिमोलंगन कार्यक्रम पार पडल्यानंतर डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील नागरिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. यावेळी एका ज्येष्ठ नागरिकाने त्यांच्याजवळ येत आपट्याची पाने म्हणजेच दसऱ्याचे सोने देऊन त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरील भाव आणि त्यांच्या कृतीतून व्यक्त झालेला जिव्हाळा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.हा प्रसंग केवळ दसऱ्याच्या शुभेच्छांपुरता मर्यादित नव्हता, तर त्यातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जपल्या जाणाऱ्या आपुलकीच्या नात्याची जाणीव झाली. लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या पश्चातही त्यांच्या कुटुंबाविषयी असलेला जिव्हाळा आणि त्यांच्या सुपुत्राविषयी व्यक्त होणाऱ्या भावना या प्रसंगातून प्रतीकात्मकरीत्या समोर आल्या.
सार्वजनिक जीवनात पद, प्रतिष्ठा आणि राजकीय घडामोडी यांना महत्त्व असते; परंतु सामान्य नागरिकांशी निर्माण झालेले भावनिक नाते हे वेगळे स्थान राखते. ज्येष्ठ नागरिकाने डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांना दिलेले दसऱ्याचे सोने हा अशाच भावनेचा एक हृद्य क्षण ठरला. या कृतीतून त्यांनी डॉ. धवलसिंह यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
अकलूजच्या अकलाई देवी मंदिरात घडलेल्या या प्रसंगाने दसऱ्याच्या सणातील परंपरा, संस्कार आणि माणुसकीचे दर्शन घडवले. आपट्याच्या पानांच्या रूपाने दिलेले हे सोने केवळ सणाचे प्रतीक न राहता श्रद्धा, जिव्हाळा आणि आपुलकी व्यक्त करणारा भावस्पर्शी क्षण ठरला.



