नातेपुते पोलिस स्टेशनच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; ग्रामस्थांचे वरिष्ठांना साकडे

नातेपुते पोलिस स्टेशनच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; ग्रामस्थांचे वरिष्ठांना साकडे
राजकीय दबावातून गुन्हे दाखल होतात, खऱ्या तक्रारी मात्र धूळ खातात? ग्रामस्थांचा गंभीर आरोप
संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)
नातेपुते पोलिस स्टेशनच्या कामकाजात राजकीय हस्तक्षेप होत असून, काही व्यक्तींवर चुकीची कलमे लावून गुन्हे दाखल केले जात असल्याचा, तर दुसरीकडे प्रत्यक्ष घडलेल्या घटनांच्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप समस्त नातेपुते व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा १५ दिवसांनंतर नातेपुते पोलिस स्टेशनविरोधात कायदेशीर मार्गाने शांततेत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यासंदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक, नातेपुते पोलिस स्टेशन यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले असून, या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, पोलीस अधीक्षक सोलापूर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज यांना पाठविण्यात आल्या आहेत.निवेदनात म्हटले आहे की, २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कृष्ण मोहन सावंत, अमोल लालासो सावंत, विशाल दत्तात्रय पवार आणि किर्दक कुटुंबीय यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली होती. मात्र, संबंधित कुटुंबातील व्यक्ती राजकीय पुढाऱ्यांच्या जवळच्या असल्याने राजकीय दबावातून भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४ व ११९(१) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. किरकोळ वादाचे स्वरूप असताना गंभीर कलमे लावण्यात आल्याचा दावा करत संबंधित व्यक्तींना बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.तसेच, राजकीय दबावामुळे पोलिसांच्या कामकाजात पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राशी संबंधित ज्येष्ठ व्यक्तींनाही तालुकानिहाय मतदान समजत असल्याचे सांगून धमकावले जात असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
शिवप्रसाद दूध संघाच्या मशिनरीचा प्रश्नही ऐरणीवर
शिवप्रसाद दूध संघाच्या मशिनरीसंदर्भात सन्माननीय शरद मोरे यांनी मागील सुमारे सहा महिन्यांपासून एका व्यक्तीने संघाची मशिनरी बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवल्याबाबत ऑनलाइन तसेच प्रत्यक्ष भेटून तक्रारी केल्या आहेत. मात्र, या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणातही राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा संशय निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे.याशिवाय, नातेपुते पोलिस स्टेशनच्या हद्दीत जोरे नावाच्या व्यक्तीवर वारंवार अन्याय होत असतानाही त्याच्या तक्रारींची दखल घेण्यात आली नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या कथित प्रकारांमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
१५ दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा शांततेत आंदोलन
पोलिस स्टेशनमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक तक्रारीची वस्तुस्थिती तपासून निष्पक्षपणे कार्यवाही व्हावी, कोणाच्याही राजकीय जवळिकीवरून गुन्हे दाखल होऊ नयेत आणि प्रत्यक्ष अन्याय झालेल्या नागरिकांना न्याय मिळावा, अशी ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे.
या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. संबंधित तक्रारींची सत्यता तपासून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा १५ दिवसांनंतर समस्त नातेपुते व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने कायद्याच्या चौकटीत राहून शांततेने आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.नातेपुते पोलिस स्टेशनच्या कार्यपद्धतीवर उपस्थित करण्यात आलेल्या या गंभीर प्रश्नांमुळे आता वरिष्ठ पोलीस अधिकारी या तक्रारींची काय दखल घेतात आणि चौकशीतून काय निष्पन्न होते, याकडे नातेपुते व पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



