ऊस दराच्या लढ्याची रणधुमाळी १६ नोव्हेंबरच्या मोर्चासाठी स्वाभिमानीचा शेतकरी जनजागृती दौरा !

ऊस दराच्या लढ्याची रणधुमाळी १६ नोव्हेंबरच्या मोर्चासाठी स्वाभिमानीचा शेतकरी जनजागृती दौरा !
संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य आणि हक्काच्या ऊसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता आंदोलनाची जोरदार तयारी सुरू केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली येत्या १६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी विशेष गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.असा आहे गावभेट दौऱ्याचा कार्यक्रम :
सायंकाळी ५ वाजता – नेवरे-कांदलगुडा : राम मंदिर येथे बैठक.सायंकाळी ६ वाजता – जांबुड : खंडोबा मंदिर येथे बैठक,सायंकाळी ७ वाजता – मिरे (सेक्टर १६) : जिल्हा परिषद शाळेत बैठक.रात्री ८ वाजता – उंबरे (बु.) : खंडोबा मंदिर येथे बैठक.ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी वर्षभर कष्ट करून ऊस पीक उभे केले आहे. मात्र, उत्पादन खर्च, मजुरी, खते, औषधे आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ होत असताना शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे ऊसदराचा प्रश्न केवळ एखाद्या शेतकऱ्याचा नसून संपूर्ण ऊस पट्ट्यातील शेतकरी बांधवांच्या अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मोर्चाला मोठे बळ देण्याचा निर्धार संघटनेने केला आहे.
“ही लढाई कोण्या एका व्यक्तीची नसून संपूर्ण ऊस उत्पादक शेतकरी बांधवांच्या न्याय्य हक्काची आहे. त्यामुळे ऊस पट्ट्यातील शेतकरी भावांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने या लढ्यात उतरावे. गुरुवारच्या गावभेट दौऱ्यात बहुसंख्येने उपस्थित राहून १६ नोव्हेंबरच्या मोर्चासाठी सज्ज व्हावे,” असे आवाहन अजित (भैय्या) बोरकर यांनी केले आहे.लढाई हक्काची… लढाई ऊसदराची… आता माघार नाही, असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने व्यक्त केला आहे.



