ऊस पट्यात आंदोलना चे वारे! शेतकरी एकवटले मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार सोलापुरात शक्ती प्रदर्शन!

ऊस पट्यात आंदोलना चे वारे! शेतकरी एकवटले मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार सोलापुरात शक्ती प्रदर्शन!
संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चालू गळीत हंगामासाठी किमान ३५०० रुपये प्रतिटन पहिला हप्ता मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या ऊसदराच्या लढ्याला माळशिरस तालुक्यात दिवसेंदिवस मोठे बळ मिळत आहे. नेवरे, जांभूड, मिरे आणि उंबरे या गावांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या घोंगडी बैठकींना शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ऊसदराच्या आंदोलनाला ठाम पाठिंबा दर्शविला.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आगामी १६ नोव्हेंबर रोजी सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यात गावोगावी घोंगडी बैठका घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे.

याच अनुषंगाने नेवरे, जांभूड, मिरे आणि उंबरे येथे बैठका घेण्यात आल्या.या बैठकांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध अडचणी, साखर कारखानदारांकडून दिला जाणारा ऊसदर, एफआरपीचे तुकड्यांमध्ये होणारे वाटप आणि वाढता उत्पादन खर्च यावर चर्चा करण्यात आली. शेतीसाठी लागणारे खते, औषधे, मजुरी, वाहतूक आणि मशागतीचा खर्च दिवसेंदिवस वाढत असताना शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव मिळणे आवश्यक असल्याची भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

एकरकमी एफआरपी आणि किमान ३५०० रुपये प्रतिटन ऊसदर मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होणार नाही. त्यामुळे आपल्या न्याय्य हक्कांसाठी आता संघटितपणे संघर्ष करण्याची वेळ आली आहे, असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. चारही गावांतील शेतकऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा देत १६ नोव्हेंबरच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याची तयारी दर्शविली.या घोंगडी बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, ज्येष्ठ नेते मगन काळे, माळशिरस तालुकाध्यक्ष अजित बोरकर, सचिन पाटील, सचिन आटकळे, नवनाथ माने यांच्यासह संबंधित गावांतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माळशिरस तालुक्यातील गावोगावी मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता ऊसदराच्या आंदोलनाची धार अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. आता १६ नोव्हेंबर रोजी सोलापूर येथे होणाऱ्या मोर्चात किती मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होतात आणि राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ऊसदराच्या लढ्याला कोणती दिशा मिळते, याकडे संपूर्ण ऊसपट्ट्याचे लक्ष लागले आहे.३५०० रुपयांचा पहिला हप्ता,एकरकमी एफआरपी आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आता गावोगावचा शेतकरी एकवटू लागला असून, ऊसदराच्या लढ्याने माळशिरस तालुक्यात जोर धरला आहे.



