solapur

सद्गुरू कारखान्याची ३,५०० रुपयांची दरघोषणा! शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय! राजू शेट्टींच्या लढ्याला सद्गुरू कारखान्याचा सकारात्मक प्रतिसाद!

सद्गुरू कारखान्याची ३,५०० रुपयांची दरघोषणा!

शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय! राजू शेट्टींच्या लढ्याला सद्गुरू कारखान्याचा सकारात्मक प्रतिसाद!

संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य ऊसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उभारलेल्या लढ्याला अखेर यश मिळू लागले असून, सद्गुरू श्री श्री साखर कारखाना लि., राजेवाडी (ता. आटपाडी, जि. सांगली) यांनी गाळप हंगाम २०२६-२७ साठी प्रतिमेट्रिक टन ३ हजार ४०० रुपये पहिली उचल जाहीर केली आहे. तसेच दिवाळी सणानिमित्त दुसरा हप्ता म्हणून प्रतिटन १०० रुपये देण्याचेही कारखाना प्रशासनाने पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ऊसदराच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लढ्याला महत्त्वपूर्ण यश मिळाल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, यासाठी राज्यभर ऊसदराचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. ऊस उत्पादकांच्या घामाला योग्य मोबदला मिळालाच पाहिजे, या ठाम भूमिकेतून संघटनेने कारखानदारांच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेतली. ऊसदराच्या प्रश्नावर संघटनेने सुरू केलेल्या संघर्षामुळे साखर कारखानदारांवरही दर जाहीर करण्यासाठी दबाव निर्माण झाला आहे.याच पार्श्वभूमीवर सद्गुरू श्री श्री साखर कारखान्याने १९ नोव्हेंबर २०२६ रोजी राजू शेट्टी यांना अधिकृत पत्र पाठवून गाळप हंगाम २०२६-२७ मध्ये कारखान्याकडे गाळपासाठी येणाऱ्या उसाला प्रतिमेट्रिक टन ३ हजार ४०० रुपये पहिली उचल आणि दिवाळी सणाकरिता दुसरा हप्ता म्हणून प्रतिटन १०० रुपये जाहीर केले आहेत. कारखान्याचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्या स्वाक्षरीने हे पत्र देण्यात आले आहे.विशेष म्हणजे, ऊसदराच्या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांनीही सातत्याने आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांना संघटित करण्याचे काम केले. ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर बैठका, जनजागृती आणि आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यात आला. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने उभारलेल्या या संघर्षाला आता कारखान्यांच्या दर घोषणांमधून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे.संघटनेच्या संघर्षाला मिळणारे हे यश म्हणजे शेतकऱ्यांच्या एकजुटीची ताकद आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी एकत्र आल्यास कारखानदारांनाही शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी लागते, हे या घडामोडीतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.दरम्यान, सद्गुरू श्री श्री साखर कारखान्याने जाहीर केलेल्या या दरामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, ऊस उत्पादकांना त्यांच्या उसाचा योग्य आणि समाधानकारक दर मिळेपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लढा सुरूच राहणार, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.एकजुटीचा आवाज बुलंद झाला, संघर्षाला यश मिळू लागले आणि ऊस उत्पादकांच्या हक्काच्या लढ्याला नवी दिशा मिळाली, अशीच भावना या निर्णयातून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button