ऊस दराच्या लढ्याला कारखान्याचा प्रतिसाद; गाळप बंद, मात्र तोडलेला ऊस आणण्याचे आवाहन!

ऊस दराच्या लढ्याला कारखान्याचा प्रतिसाद; गाळप बंद, मात्र तोडलेला ऊस आणण्याचे आवाहन!
अजित बोरकर यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद; अंतिम निर्णय होईपर्यंत सद्गुरू श्री श्री साखर कारखान्याचे गाळप बंद
संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)
ऊस दराच्या प्रश्नावर शेतकरी संघटनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेची दखल घेत सद्गुरू श्री श्री साखर कारखाना, रांजणी यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ऊस दराबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत कारखान्याचे गाळप आज सकाळपासून बंद ठेवण्यात आल्याचे पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक यांनी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांना पत्र पाठवून ही भूमिका मांडली आहे.ऊस दराच्या प्रश्नावर शेतकरी संघटनेने घेतलेली भूमिका आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेले प्रयत्न कारखाना प्रशासनाला मान्य असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. ऊस दराबाबत लवकरच योग्य व सकारात्मक निर्णय घेण्याचा कारखाना प्रशासनाचा प्रयत्न असल्याचेही सांगण्यात आले आहे. दराबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत कारखान्याचे गाळप बंद ठेवण्याची अजित बोरकर यांची विनंती मान्य करण्यात आल्याचे पत्रातून स्पष्ट झाले आहे.मात्र, या निर्णयाबरोबरच कारखाना प्रशासनाने एक महत्त्वाची विनंतीही केली आहे. ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणेमार्फत यापूर्वीच तोडण्यात आलेला ऊस शेतात अथवा वाहनांमध्ये अडकून राहिल्यास शेतकरी, ऊसतोड कामगार आणि वाहतूकदारांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच तोडलेला ऊस गाळपासाठी कारखान्याकडे आणण्यास सहकार्य करावे, अशी विनंती कारखाना प्रशासनाने केली आहे.शेतकऱ्यांचे हित जपणे हाच कारखाना प्रशासन आणि शेतकरी संघटनेचा समान उद्देश असल्याचे स्पष्ट करत परस्पर विश्वास व सामंजस्यातून ऊस दराबाबत योग्य तो निर्णय घेण्याची भूमिका पत्रात मांडण्यात आली आहे.दरम्यान, ऊस दराच्या प्रश्नावर शेतकरी संघटनेने घेतलेल्या भूमिकेला कारखाना प्रशासनाकडून मिळालेला हा प्रतिसाद महत्त्वपूर्ण मानला जात आहे. गाळप बंद ठेवण्याचा निर्णय आणि तोडलेल्या उसाच्या गाळपासाठी केलेली विनंती यामुळे ऊस दराच्या आंदोलनाला आता कोणते वळण मिळणार, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



