राजू शेट्टींच्या मार्गदर्शनाखाली ऊस दराचा लढा यशस्वी; अजित बोरकर यांच्या कार्याचा खंडाळीत सन्मान!

राजू शेट्टींच्या मार्गदर्शनाखाली ऊस दराचा लढा यशस्वी; अजित बोरकर यांच्या कार्याचा खंडाळीत सन्मान!
संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यात ऊसदराचा लढा उभारण्यात आला होता. या आंदोलनात माळशिरस तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित बोरकर यांनी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांना संघटित करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनातून ऊसदराच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या लढ्याला यश मिळाल्याबद्दल खंडाळी येथे अजित बोरकर यांचा शाल देऊन सन्मान करण्यात आला.शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळावा, त्यांच्या कष्टाचे चीज व्हावे आणि ऊस उत्पादकांची आर्थिक पिळवणूक थांबावी, या उद्देशाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊसदराचा प्रश्न ऐरणीवर आणण्यात आला होता. या लढ्यात राजू शेट्टी यांनी माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना एकत्र आणत आंदोलनाला दिशा दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात बोरकर यांनी गावोगावी शेतकऱ्यांशी संपर्क साधला. ऊस उत्पादकांच्या अडचणी समजून घेत त्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांची एकजूट निर्माण करून ऊसदराच्या मागणीसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.या आंदोलनात शेतकऱ्यांनी दाखवलेली एकजूट, संघटनेने घेतलेली ठाम भूमिका आणि कार्यकर्त्यांनी केलेले प्रयत्न यामुळे ऊसदराच्या प्रश्नावर सकारात्मक यश मिळाले. या यशामध्ये अजित बोरकर यांनी बजावलेल्या भूमिकेची दखल घेत खंडाळी येथील ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या नेतृत्वाचा गावकऱ्यांनी केलेला हा सन्मान विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.यावेळी खंडाळीचे ज्येष्ठ नेते तथा माजी सरपंच बाबुराव पताळे, सरपंच सुरेश सुरवसे, धनाजी डोंबाळे, सचिन पताळे, आबासाहेब गोसावी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रामस्थ आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सत्काराला उत्तर देताना बोरकर यांनी उपस्थित सर्व मान्यवर, ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. ऊसदराचा लढा हा कोणत्याही एका व्यक्तीचा नसून तो संपूर्ण शेतकरी बांधवांच्या एकजुटीचा विजय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनामुळे आणि शेतकऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच हा लढा यशस्वी होऊ शकला. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी यापुढेही संघटनेच्या माध्यमातून सातत्याने संघर्ष सुरू राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली.शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी समाज उभा राहतो, याचेच प्रतीक म्हणजे बोरकर यांचा खंडाळी येथे झालेला सन्मान होय. ऊसदराच्या लढ्यातील योगदानाची ग्रामस्थांनी घेतलेली दखल ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.



