solapur

शेतकऱ्यांना ५० रुपयांचा फायदा! स्वाभिमानी च्या संघर्षाचा परिणाम!  ओंकार  कारखान्याची पहिली उचल ३३०० रुपये जाहीर

शेतकऱ्यांना ५० रुपयांचा फायदा!
स्वाभिमानी च्या संघर्षाचा परिणाम! 

ओंकार  कारखान्याची पहिली उचल ३३०० रुपये जाहीर

संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काच्या दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उभारलेल्या ऊसदर आंदोलनाला यश मिळताना दिसत आहे. इतर साखर कारखान्यांनी पहिली उचल ३२५० रुपये जाहीर केलेली असताना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा प्रभाव लक्षात घेऊन ओंकार साखर कारखाना प्रा. लि., चांदापुरी युनिट(ता.माळशिरस) क्रमांक १ ने पहिली उचल प्रतिटन ३३०० रुपये देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे इतर कारखान्यांच्या तुलनेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ५० रुपये अधिक मिळणार आहेत. शेतकऱ्यांच्या एकजुटीला आणि संघटनेच्या संघर्षाला मिळालेले हे महत्त्वपूर्ण यश मानले जात आहे.
 ओंकार साखर कारखान्याने सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना २४ नोव्हेंबर २०२६ रोजी पाठविलेल्या पत्रातून गाळप हंगाम २०२६-२७ साठी ऊसदराचे धोरण स्पष्ट केले आहे. या पत्राची प्रत कारखान्याचे कार्यकारी संचालक भीमराव वाघमोडे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना, माळशिरस तालुका यांनाही देण्यात आली आहे.या वेळी स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर, ज्येष्ठ नेते मगन काळे,धनाजी डोंबाळे, नेमचंद शिंदे,अभिजीत सुरवसे, रामचंद्र काळे राजाभाऊ खरात, विलास काळे, किरण लोखंडे, कैलास इंगळे, यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते कारखाना व्यवस्थापनाने जाहीर केलेल्या दरानुसार, गाळप हंगाम २०२६-२७ मध्ये कारखान्याकडे गाळपासाठी येणाऱ्या उसाला पहिली उचल म्हणून प्रतिटन ३३०० रुपये अदा करण्यात येणार आहेत. तर दुसरी उचल गाळप हंगाम संपल्यानंतर रकमेच्या उपलब्धतेनुसार प्रतिटन १०० रुपये देण्यात येणार आहे
 तिसऱ्या हप्त्याबाबतही कारखान्याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गाळप हंगाम २०२६-२७ मध्ये उत्पादित झालेल्या संपूर्ण साखरेची सरासरी विक्री किंमत प्रतिकिलो ४५ रुपयांपेक्षा जास्त मिळाल्यास आणि आर.एस.एफ.नुसार ७० टक्के व ३० टक्के फॉर्म्युल्याप्रमाणे रक्कम उपलब्ध झाल्यास प्रतिटन १०० रुपये अदा करण्यात येतील, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
 म्हणजे, इतर कारखान्यांकडून पहिली उचल ३२५० रुपये दिली जात असताना ओंकार साखर कारखान्याने ३३०० रुपयांची पहिली उचल जाहीर केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदरासाठी सातत्याने केलेली आंदोलने, शेतकऱ्यांची एकजूट आणि वाढीव दरासाठी घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे कारखाना व्यवस्थापनाला पहिल्या उचलीत ५० रुपयांची वाढ करावी लागल्याची चर्चा ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळावा, एकरकमी एफआरपी मिळावी आणि उसाला समाधानकारक दर मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ऊसदराची लढाई सुरू आहे. या लढ्याला मिळणारा प्रतिसाद पाहता कारखानदारांनाही दराबाबत सकारात्मक निर्णय घ्यावे लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
 एकंदरीत, इतर कारखान्यांच्या ३२५० रुपयांच्या पहिल्या उचलीच्या तुलनेत ओंकार साखर कारखान्याने जाहीर केलेली ३३०० रुपयांची पहिली उचल ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची महत्त्वपूर्ण फलश्रुती मानली जात असून, या निर्णयामुळे माळशिरस तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button