
राष्ट्रवादी अजितदादा गट कृषिमंत्री दत्तात्रय भरणे सोलापूरचे संपर्कमंत्री
संचार वृत्त अपडेट
राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या सोलापूर जिल्हा संपर्क मंत्रिपदी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी नुकतेच एक पत्र काढले असून त्यात वाशिम या जिल्ह्याचे पालकमंत्री व सोलापूर, धाराशिव आणि जालना या तीन जिल्ह्यांचे संपर्कमंत्री म्हणून पक्ष संघटनेच्या दृष्टीने कृषिमंत्री भरणे यांच्यावर जबाबदारी देण्यात आल्याचे म्हटले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कृषिमंत्री आगामी निवडणुका राष्ट्रवादी पक्षाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी भरणे यांनी या चार जिल्ह्यांमध्ये जाऊन १० ते १८ ऑक्टोबर या कालावधीमध्ये राष्ट्रवादी पक्ष संघटनेच्या आढावा बैठका घ्याव्यात. या बैठकांना जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष तसेच आजी-माजी आमदार, खासदार, जिल्ह्यातील पक्षाचे प्रमुख मान्यवर, जिल्हा कार्यकारिणी फ्रंटल व सेलचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी व सदस्यांना निमंत्रित करण्याबाबत जिल्हाध्यक्षांना सूचना द्याव्यात. आगामी निवडणुकीत यश मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे पत्रात म्हटले आहे.
कृषिमंत्री भरणे यांच्या या निवडीचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा, माजी नगरसेवक तौफिक शेख,सुनील पालवे यांनी स्वागत केले आहे.



