शहीद जवान अमर रहे! लक्ष्मण पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, गावकऱ्यांचे डोळे पाणावले

शहीद जवान अमर रहे! लक्ष्मण पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, गावकऱ्यांचे डोळे पाणावले
संचार वृत्त अपडेट
माळशिरस तालुक्यातील गिरझणी गावातील भूमिपुत्र आणि भारतीय सैन्य दलातील जवान लक्ष्मण संजय पवार (वय ३३) यांच्यावर आज, शुक्रवारी, त्यांच्या मूळ गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पश्चिम बंगालमधील बागडोगरा येथे कर्तव्यावर असताना १३ मे रोजी शहीद झालेल्या या वीर जवानाला हजारो ग्रामस्थ, माजी सैनिक आणि नागरिकांनी अश्रूंच्या डोळ्यांनी अखेरचा निरोप दिला. “जवान लक्ष्मण पवार अमर रहे”, “भारत माता की जय”, “वंदे मातरम”च्या घोषणांनी आणि “जो शहीद हुए हैं उनकी, जरा याद करो कुर्बानी” या गीताने स्मशानभूमी परिसर दणाणून गेला.
अंत्ययात्रेत हजारोंचा सहभाग:
सकाळी १० वाजता जवान लक्ष्मण पवार यांचे पार्थिव अकलूज येथे आणण्यात आले. अकलूजच्या महर्षी चौकापासून गिरझणीपर्यंत तिरंग्यात लपेटलेले त्यांचे पार्थिव सजवलेल्या रथावर ठेवून अंत्यदर्शन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत माजी सैनिकांसह हजारो नागरिक सहभागी झाले. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी आणि पुष्पचक्र अर्पण करत शहीद जवानाला आदरांजली वाहिली.
भावनिक वातावरण:
मिरवणुकीनंतर पार्थिव गिरझणी येथील राहत्या घरी आणण्यात आले. यावेळी जवान पवार यांच्या आई-वडील, भाऊ-बहीण आणि कुटुंबीयांचा शोक अनावर झाला. काही काळ पार्थिव घरासमोरील मंडपात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले, जिथे हजारो ग्रामस्थांनी आपल्या गावच्या सुपुत्राला सलाम करत अश्रूभरल्या डोळ्यांनी निरोप दिला. यानंतर अंत्ययात्रा गावातील स्मशानभूमीकडे निघाली. जवान पवार यांचे बंधू विकी पवार यांनी चितेला अग्नी दिला.
शहीदाचे बलिदान:
लक्ष्मण पवार भारतीय सैन्य दलात नायक या रँकवर पश्चिम बंगालमधील बागडोगरा येथे कर्तव्य बजावत होते. १३ मे रोजी कर्तव्यावर असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या बलिदानाने गावासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. अंत्यसंस्कारादरम्यान उपस्थित ग्रामस्थ आणि नागरिकांनी त्यांच्या देशभक्ती आणि शौर्याला मानवंदना दिली.