गवत्या या बिगरविषारी सापाने घातली अंडी

गवत्या या बिगरविषारी सापाने घातली अंडी
संचार वृत्त अपडेट
माळशिरस येथील सर्पमित्र महेश भोसले यांना उंबरे-दहिगाव येथून भाऊ वाघमोडे या शेतकरी बांधवाचा फोन येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता वाघमोडे यांच्या घरी जाऊन गवत्या या बिगरविषारी सापाची मादी अत्यंत सहजतेने पकडून जाड कागदी बॉक्स मध्ये आणली. काही कालावधी नंतर निसर्गाच्या सानिध्यात सोडायला जात असतानाच सर्पमित्र भोसले यांनी बॉक्स मध्ये पाहिले तर गवत्या या मादीने एक अंडे घातल्याचे त्यांच्या निरीक्षणास आले.
अकलूज येथील सर्प अभ्यासक प्रा.धनंजय देशमुख यांच्या सोबत चर्चा करून भोसले यांनी आजून काही अंडी ही गवत्या मादी घालेल म्हणून संध्याकाळपर्यंत निरीक्षण केले असता एकच अंडे दिसले शेवटी त्यांनी निसर्गाच्या सान्निध्यात अडचणीच्या गवताळ जागी हा साप अंड्यासह सोडून दिला.
भारतामध्ये सर्वत्र आढळणारा गवत्या (ग्रीन किल बॅक)हा बिगर विषारी,निरूपद्रवी असणारा साप संपूर्ण गवता सारखा हिरव्या रंगाचा दिसतो. त्याच्या मानेपासून अर्ध्या शरीरापर्यंत पांढऱ्या रंगाच्या उभ्या, आडव्या,तुटक अशा काळ्या रेषा असतात.पोटाखालचा भाग पांढरा असतो. त्याला डिवचले असता तो इतर सांपाप्रमाणे इंग्रजी S(एस) सारखे शरीराचे वेटोळे करून अंग आकसून घेतो.त्याला फारच त्रास दिला तर रागात आला असता तोंड फुगवतो त्यामुळे त्याने फणा काढल्याचा भास होतो. हा अत्यंत संथ गतीने चालतो. त्याची सरासरी लांबी दोन ते तीन फूट असते.संपूर्ण वाढ झालेली मादी १०ते१२ अंडी घालते.
प्रा.धनंजय देशमुख
सर्पअभ्यासक,अकलूज