रावबहाद्दूर गट( बिजवडी) शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

रावबहाद्दूर गट( बिजवडी) शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
संचार वृत्त अपडेट
जि. प .प्रा. शाळा, रावबहाद्दूर गट (बिजवडी)येथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त व स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, थोर समाजसेवक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन मुख्याध्यापक श्रीकांत राऊत सर यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीकांत राऊत सर यांनी विद्यार्थ्यांना दोन्ही महापुरुषांबद्दल माहिती दिली. ज्याच्या वाट्याला दीड दिवसाची शाळा आली त्या लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी ४० कादंबऱ्या, २३ कथासंग्रह ,१४ लोकनाट्ये,१५ पोवाडे, एक नाटक, एक प्रवास वर्णन इतकी साहित्य संपदा निर्माण केली. त्यांच्या या कथांवर आणि कादंबरीवर नऊ चित्रपट निघाले. त्यांचे सर्व साहित्य जगातील एकूण वीस भाषांत अनुवादित झालेले आहे.
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी गर्जना करून, समाज जागृतीसाठी लेखणी आवश्यक असल्याचे चाणाक्षपणे ओळखून लोकमान्य टिळकांनी ‘केशरी’ व ‘मराठा’ यासारखी वृत्तपत्रे सुरू केली. स्वराज्य प्राप्तीसाठी त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला. मोडेल पण वाकणार नाही अशी त्यांची स्वराज्यासाठी मनापासून तयारी होती. लोकमान्य टिळक भारतीय स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर लढले .अशाप्रकारे दोन्ही महापुरुषांचा जीवन परिचय मुख्याध्यापक. श्रीकांत राऊत यांनी सांगितला.
सदर कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका सारिका चव्हाण, गिरीजा गेजगे, पालक रतन लोखंडे, सुशीला शिंदे ,अश्विनी गरुड, आशा भजनावळे, दिपाली लोखंडे उपस्थित होत्या. सूत्रसंचालन व आभार उपशिक्षक अजमीर फकीर यांनी केले.