सर्पदंश आणि उपचार (चला मैत्री करू या सापाशी)

सर्पदंश आणि उपचार (चला मैत्री करू या सापाशी )
संचार वृत्त अपडेट
साप दंश करतो तो पायाला किंवा हाताला बाकी अवयवांच्या ठिकाणी फार कमी दंश होतात.साप जेव्हा दंश करण्याच्या तयारीत असतो तेव्हा तो एका सरळ रेषेत झेप घेऊन बरोबर भक्ष्यावर नेम साधतो. झेप घेत असताना साप तोंड उघडतो त्या वेळी त्याच्या विषारी सुळ्या दातांची ठेवण सरळ उभी बनते हे उभे विषाचे दात भक्ष्याच्या अंगात रोवल्यानंतर त्या विषारी दातांच्या वर लागून असलेल्या विष ग्रंथीतून विष भक्ष्याच्या अंगात जाते.ज्याप्रमाणे औषधाच्या ड्रॉपरवर दाब दिला असता औषधाचा थेंब बाहेर येतो त्याप्रमाणे हे विष भक्ष्याच्या शरीरात पोहोचते.
सामान्यपणे सर्पदंशामुळे मृत्यू उडवतोच असे नाही. विषारी सापाने दंश केला असता त्याने विषाची मात्रा किती प्रमाणात शरीरात सोडली त्यावर तो दंश धोकादायक आहे किंवा नाही हे अवलंबून असते. अनेक विषारी सापांचे दंश हे काही वेळी कोरडेच असू शकतात तर कधी कधी सापांचे एकमेकांमध्ये भांडण होऊन किंवा भक्ष्याला मारण्यात सापांचे विष जाते यावेळेस सापांचा आपल्याला दंश झालेला असेल तर तो घातक नसतो. तसेच आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती, मानसिकता कशी आहे यावर परिणाम दिसून येतो म्हणजेच या दोन्ही प्रकारात विषारी सापाने दंश केला तर माणूस मरतोच असे नाही मात्र पुरेसे विष दंश झाल्यानंतर सोडले असेल तर मात्र मृत्यू येऊ शकतो.
सापाच्या विषाचे प्रकार- सापाच्या विषाचे दोन प्रकार पडतात १)न्यूरोटॉक्सिक (मज्जाबाधक सर्पदंश)- हे विष मज्जासंस्था किंवा चेतासंस्थेवर अनिष्ट परिणाम करते. नाग, मण्यार यांचे विष या प्रकारात मोडते.यामध्ये दंश झालेल्या जागी वेदना होतात तर कधी कधी वेदनाही होत नाहीत, चावलेल्या जागी सूज येते,डोळ्यापुढे अंधारी येते,पापण्या जड होतात, पाय थरथरतात, बोलणे अडखळते,
श्वास घेण्यास त्रास होतो, दम लागणे अशी लक्षणे दिसून येतात.
*२) हेमोटॉक्सिक (रक्तबाधक सर्पदंश)-* हे विष रक्त व रक्तवाहिन्यांवर परिणाम करते, ज्यामुळे रक्त गोठण्यास किंवा रक्तस्त्राव होण्यास सुरुवात होते.घोणस व फुरसे यांचे विष या प्रकारात मोडते. नाडी जलद चालणे,शरीर थंड पडू लागणे,डोळ्यांच्या भावल्या प्रसरण पावणे, मळमळल्यासारखे होणे, अशक्तपणा वाटणे, तसेच यामध्ये दंश झालेल्या भागातून रक्त मिश्रित द्रव पाझरू लागतो, नाक, हिरड्या, लघवी,गुदद्वार इत्यादीतून रक्तस्त्राव सुरू होतो, साधारणपणे चोवीस तासानंतर मूत्रपिंडाचे कार्य बंद झाल्याने रोग्याला अतिमूत्रता आजार होऊन विष रक्तात पसरू लागते.
या दोन्ही प्रकारामध्ये वेळीच व योग्य वैद्यकीय उपचार घेतल्यास व्यक्तीचा मृत्यू टाळता येतो.
सर्पदंश झाला असता तो दंश विषारी सापापासून की बिनविषारी सापापासून झालेला आहे हे सर्पदंशाच्या खुणावरून सहज समजून येते.जर विषारी साप चावला असेल तर दंशाच्या ठिकाणी दोन ठळक खुणा(सुळ्या विषारी दातामुळे) व त्याचे खाली इंग्रजीतील U(यु)आकारात खुणा स्पष्टपणे आढळून येतात. परंतु बिनविषारी साप चावला असेल तर दोन ठळक खुणा दंशाच्या जागेवर आढळून येत नाहीत म्हणजेच फक्त U (यु) ह्या आकाराच्या खुणा आढळतात कारण बिनविषारी सापाच्या वरच्या जबड्यामध्ये विषाचे दात नसतात जर आपल्याला निश्चित असे समजले की त्या व्यक्तीस विषारी साप पासून दंश झाला आहे तर त्याला त्वरित प्रथमोपचार देऊन ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेणे आवश्यक आहे.
सर्पदंशावरील प्रथमोपचार-सर्पदंश झालेल्या व्यक्तीला वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात नेण्यापूर्वी काही प्राथमिक उपचार करणे आवश्यक आहेत यामध्ये दंश झालेल्या व्यक्तीच्या भोवती गर्दी करू नये,शांतता राखावी,त्याला घाबरून न देता धीर द्यावा. सर्पदंश झालेल्या भागाच्या वरच्या बाजूस ताबडतोब आवळपट्टी बांधावी त्यामुळे रक्ताभिसरण सहज थांबेल. सर्प विष प्रतिबंधक लस उपलब्ध असलेल्या जवळच्या रुग्णालयात त्या व्यक्तीला त्वरित हलवावे परंतु कोणत्याही प्रकारची हालचाल अथवा परिश्रम त्या व्यक्तीला करू देऊ नये. सर्पदंश झालेल्या व्यक्तीने वांती केल्यास त्याला उजव्या किंवा डाव्या कुशीवर झोपावे असे केल्याने त्याला श्वासोच्छ्वासास अडथळा येणार नाही तो सहज होईल.
*सर्पदंशावरील वैद्यकीय उपचार-*
सर्पदंश (Snake bite) झाल्यावर त्वरित वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे. सर्पदंशावर उपचार म्हणून सापाच्या विषापासूनच तयार केलेले अँटीवेनम (Antivenom) दिले जाते, जे सापाच्या विषाचा शरीरावर होणारा परिणाम कमी करते. भारतात सर्वत्र आढळणाऱ्या अत्यंत विषारी असलेल्या चार प्रकारच्या सापांच्या दंशावर हाफकिन इन्स्टिट्यूट,मुंबई या संस्थेने विष प्रतिबंधक लस तयार केलेली असून ती अत्यंत परिणामकारक आहे ही विषप्रतिबंधक लस सर्व शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मोफत उपलब्ध असते. त्यामुळे सर्पदंशामुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत काही प्रमाणात का होईना आळा बसू लागला आहे.
*अत्यंत महत्त्वाचे-* सर्पदंश झालेली व्यक्ती दगावली आहे असे वाटल्यास डॉक्टरांना विनंती करून दंश झालेल्या व्यक्तीच्या जांघेत टेथेस्कोप लावण्यास विनंती करावी. कधी कधी नाडी हृदय चालत नाही असे दिसल्यास जांघेतील नाडी चालू राहते असे लक्षात आलेले आहे. यावेळी अनस्थेशिया (भूलतज्ञ) डॉक्टरांची मदत योग्य ठरते.
प्रा.धनंजय देशमुख
सर्प अभ्यासक,अकलूज
9260710710