अकलूज येथील जिल्हा परिषद मुलें नं. २ शाळेत आकाशकंदील, भेटकार्ड व पणती रंगविणे कार्यशाळा उत्साहात संपन्न

अकलूज येथील जिल्हा परिषद मुलें नं. २ शाळेत आकाशकंदील, भेटकार्ड व पणती रंगविणे कार्यशाळा उत्साहात संपन्न
संचार वृत्त अपडेट
“दीपावली सण मोठा, नाही आनंदाला तोटा” या घोषवाक्याने भारलेले वातावरण जिल्हा परिषद शाळा मुलें क्रमांक दोन, अकलूज येथे अनुभवायला मिळाले. दीपावलीच्या स्वागतार्थ इयत्ता पहिली ते सातवीतील बालचिमुकल्यांनी विविध आकर्षक आकाशकंदील, भेटकार्डे आणि पणती रंगविण्याची कार्यशाळा उत्साहात पार पाडली.
शाळेतील उपक्रमशील शिक्षिका हजराबी बांगी, फातिमा मुलाणी आणि अंजली अडाणे यांनी या उपक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या निमित्ताने शाळेत सृजनशीलतेचा झरा वाहताना दिसला.

कार्यक्रमात श्रीकांत राऊत यांनी विद्यार्थ्यांना “प्रदूषणमुक्त दीपावली” साजरी करण्याची शपथ दिली. त्यांनी फटाक्यांमुळे होणारे पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक दुष्परिणाम सोप्या भाषेत समजावून सांगितले.
तसेच शिक्षक तय्यब शेख आणि दत्तात्रय गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांविषयी प्रेरणादायी माहिती दिली. प्रतापगड, शिवनेरी, पुरंदर, सिंधुदुर्ग, जंजिरा, रायगड आणि राजगड या ऐतिहासिक किल्ल्यांची प्रतिकृती तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना गटांमध्ये विभागले गेले असून, उत्कृष्ट किल्ला निर्मितीसाठी प्रशस्तीपत्र, ट्रॉफी व बक्षीस देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. सुकुमारी अंगुळे यांनी केले. शिक्षिका मनीषा बळवंतराव, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीकांत राऊत यांनी केले.



