solapur

ओळखी वाल्यांचा ऊस तातडीने खाली ; बाकींची केवळ प्रतीक्षा

ओळखी वाल्यांचा ऊस तातडीने खाली ; बाकींची केवळ प्रतीक्षा

संचार वृत्त अपडेट 

दि.सा.माळी शुगर कारखान्याच्या गळीत हंगामाला वेग आला असला तरी ऊस उत्पादकांचे हाल संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. ओळखी वाल्याचा ऊस ओपन स्लिप देऊन तातडीने खाली होत असल्याने ऊस उत्पादकात तीव्र असंतोष पहावयास मिळत असून शेतकी अधिकाऱ्याकडून गळचेपी होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
परिस्थिती नेहमीसारखीच ‘वशिल्याभोवती’ फिरताना दिसते. फडात तुटून पडलेला ऊस वाहन वेटिंग ला थांबल्याने 24 तास वेळ खाली होण्यास लागत आहे. परिणामी वजनात घट बसून याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ज्याच्याकडे राजकीय वजन,कारखान्यातील ओळखीची ‘दांडगी यंत्रणा’किंवा प्रभावी वशिला आहे.त्यांच्या शेतातील ऊस तातडीने खाली होत आहे. तर सामान्य शेतकऱ्यांना रोज नवा त्रास सहन करावा लागत आहे. कारखान्याच्या अकार्यक्षम शेतकी अधिकाऱ्याकडून पाळी पत्रकाचा केवळ दिखावा केला जातो. अशी तक्रार ऊस उत्पादकातून सातत्याने येत आहे. कारखान्याच्या कार्यालयात फेरफटका मारत असलेल्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, बैलगाडी जाईल उद्या येईल अशी उत्तरे दिली जात आहेत. वास्तवात ही आश्वासने फक्त शब्दातच राहत असून प्रत्यक्षात वाहन शेतकऱ्यांच्या वेगळ्याच शिवारात वळवले जात आहे. सध्या साखर हंगाम जोमात आहे.मात्र अधिकाऱ्यांच्या शिफारशीवरून कारखाना परिसरा ऐवजी बाहेरील गावातील उसालाही प्राधान्य दिले जात आहे. या उलट ज्यांनी वर्षानुवर्षे कारखान्यात सभासद म्हणून निष्ठा दाखवली त्या सभासदांचा ऊस कोण काढणार? वेळेवर तोड झाली नाही तर पीक सुकते वजन कमी होऊन वजनात घट होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अधिकारी फोन उचलत नाहीत. आम्ही हात जोडून विनंती करत बसायचे का? असा संतप्त सवाल केला जात आहे. कारखाना व्यवस्थापन लक्ष देत नाही. तोड यंत्रणा ठराविक वर्तुळातच फिरते. सामान्य ऊस उत्पादकांना शेतात ट्रॅक्टर आणण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे शिष्टाई करावी लागते. जबाबदारीची जाणीव कोणालाच नाही.पाळी पत्रकाची अंमलबजावणी कडकपणे करण्याची मागणी ऊस उत्पादकाकडून होत असली तरी कारखाना व्यवस्थापन दुर्लक्ष करत असल्याचा सूर आहे. यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याच्या व्यवस्थापनाने पारदर्शकता दाखवून पाळी पत्रकानुसार अत्यंत काटेकोरपणे ऊसतोड झाली नाही तर शेतकऱ्यांचा रोष वाढण्याची शक्यता बळावणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button