माळशिरस तालुक्यात बारावीच्या परीक्षेत कॉपीचा प्रकार उघड शिक्षण अधिकारी शिक्षण जगताप यांनी केंद्र संचालकांवर दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश

माळशिरस तालुक्यात बारावीच्या परीक्षेत कॉपीचा प्रकार उघड
शिक्षण अधिकारी शिक्षण जगताप यांनी केंद्र संचालकांवर दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश
संचार वृत्त अपडेट
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथील परीक्षा केंद्रावर बारावीच्या रसायनशास्त्र (Chemistry) पेपरदरम्यान कॉपीचे गैरप्रकार होत असल्याचे सीसीटीव्ही (CCTV) निरीक्षणातून समोर आले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन जगताप यांनी संबंधित परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक तथा प्राचार्य श्री. कल्लप्पा बाबूराव बिराजदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.बुधवार, १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा रसायनशास्त्र विषयाचा पेपर होता. ‘दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, माळीनगर’ (केंद्र क्र. ४५४) येथील वर्ग खोली क्रमांक १३ मध्ये दुपारी १२:१८ वाजता काही विद्यार्थी कॉपी करत असल्याचे शिक्षण विभागाच्या नियंत्रण कक्षातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले.
तपासणीत ४-५ विद्यार्थ्यांकडे आढळली कॉपी : नियंत्रण कक्षातून तत्काळ केंद्र संचालक बिराजदार यांना फोनवरून याची माहिती देण्यात आली. त्यानंतर करण्यात आलेल्या प्रत्यक्ष तपासणीत ४ ते ५ विद्यार्थ्यांकडे कॉपीचे साहित्य मिळून आले. शासनाच्या ‘कॉपीमुक्त अभियान’ योजनेला हरताळ फासणारा हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.दोषींवर कडक कारवाईचे संकेत : याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी गटशिक्षणाधिकारी (पंचायत समिती, माळशिरस) यांना पत्र लिहून केंद्र संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आणि या घटनेचा सविस्तर अहवाल त्वरित सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या कारवाईमुळे कॉपी बहाद्दरांचे आणि अशा प्रकारांना पाठीशी घालणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.



