solapur

राजू शेट्टी ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी कोणती रणनीती आखणार? शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे;अजित बोरकर

राजू शेट्टी ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी कोणती रणनीती आखणार?

शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे; अजित बोरकर

संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर) 

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला प्रतिटन ३५०० रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीवरून सोलापूर जिल्ह्यात ऊस दराच्या संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी हे दि.८/११/२६ रविवारी रोजी पंढरपूर दौऱ्यावर येत असून, सकाळी १० वाजता त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत राजू शेट्टी ऊस दराबाबत कोणती भूमिका मांडणार, शेतकऱ्यांच्या मागणीसाठी कोणती आक्रमक भूमिका घेणार आणि ऊस दराची निर्माण झालेली कोंडी कशी फोडणार, याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
यंदाचा ऊस गळीत हंगाम सुरू झाला असताना ऊस दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उत्पादन खर्चात झालेली प्रचंड वाढ, मजुरी, खते, औषधे, मशागत, पाणी आणि वाहतूक खर्चाचा वाढता बोजा यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत ऊस उत्पादकांना योग्य आणि समाधानकारक दर मिळणे आवश्यक असल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे. प्रतिटन ३५०० रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी संघटनेने संघर्षाची तयारी सुरू केली आहे.
राजू शेट्टींच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष!
अलीकडेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संपर्क कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी ऊस दर आंदोलनाची दिशा, शेतकऱ्यांची एकजूट आणि ३५०० रुपये पहिली उचल मिळविण्यासाठी करावयाच्या आंदोलनात्मक रणनीतीवर चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर आता स्वतः राजू शेट्टी पंढरपुरात येत असल्याने ऊस दराच्या प्रश्नाला निर्णायक वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यातील दराची कोंडी सोडविण्यासाठी राजू शेट्टी नेमका कोणता फॉर्म्युला मांडणार? ३५०० रुपयांच्या पहिल्या उचलीसाठी आंदोलनाची घोषणा करणार का? कारखानदारांना कोणता इशारा देणार? तसेच जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना संघटित करून पुढील लढ्याची दिशा कशी निश्चित करणार? या प्रश्नांची उत्तरे आजच्या पत्रकार परिषदेतून मिळण्याची अपेक्षा आहे.आजच्या पत्रकार परिषदेतून ऊस दराच्या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट होणार असून, ३५०० रुपयांच्या पहिल्या उचलीचा मुद्दा किती आक्रमकपणे मांडला जातो आणि साखर कारखानदारांसमोर कोणती भूमिका ठेवली जाते, याची उत्सुकता शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे. त्यामुळे पंढरपूरमधील पत्रकार परिषद ऊस दराच्या संघर्षाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

• शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

ऊस दराचा प्रश्न हा केवळ एका संघटनेचा किंवा पदाधिकाऱ्यांचा प्रश्न नसून तो जिल्ह्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताशी संबंधित आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून आपल्या हक्काच्या दरासाठी एकजूट दाखविण्याची ही वेळ आहे. राजू शेट्टी यांच्या पंढरपूर दौऱ्यावेळी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
अजित बोरकर (स्वाभिमानी शेतकरी संघटना)

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button