solapur

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ऊस दरासाठी आरपारची लढाई! जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव!पहिल्या उचलीवर शेतकऱ्यांचा तीव्र संताप;ऊसदरासाठी संघर्ष अटळ

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ऊस दरासाठी आरपारची लढाई!

जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव!पहिल्या उचलीवर शेतकऱ्यांचा तीव्र संताप;ऊसदरासाठी संघर्ष अटळ

संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)

सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पहिल्या उचलीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, ३१५०/- रुपयांची पहिली उचल जाहीर करणाऱ्या साखर कारखानदारांविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ऊस दराच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा आणि रणनीती निश्चित करण्यात आली. त्यानुसार सोमवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उचल जाहीर केली आहे. मात्र, वर्षभर कष्ट करून, मोठा आर्थिक खर्च करून ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या अपेक्षांच्या तुलनेत ही रक्कम अपुरी असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेत आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली.

शेतकऱ्यांच्या ऊस दराच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीला कारखानदारांच्या भूमिकेशी संबंधित आमदार, खासदार उपस्थित न राहिल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहून आपली भूमिका स्पष्ट करणे अपेक्षित असताना त्यांनी पाठ फिरविल्याची भावना मेळाव्यात व्यक्त करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.यंदाच्या हंगामात सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखानदारांनी ४२००/- ते ४३००/-/-रुपये प्रतिक्विंटल दराने साखर विक्रीचे करार करून व्यापाऱ्यांकडून आगाऊ रक्कम घेतल्याचे मेळाव्यात सांगण्यात आले. असे असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र केवळ तीन हजार रुपयांची पहिली उचल देण्याची भूमिका का घेतली जात आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
यंदा दुष्काळाचे कारण पुढे करून अनेक साखर कारखाने महिनाभर आधीच सुरू करण्यात आले. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात गाळप सुरू झाल्याने सुरुवातीला उसाची रिकव्हरी अवघी सहा टक्क्यांच्या आसपास असल्याचा दावा शेतकरी प्रतिनिधींनी केला. यामुळे कमी साखर उताऱ्याचा फटका शेतकरी आणि साखर कारखानदारीलाही बसल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
ऊस दराच्या प्रश्नावर निर्णायक लढा उभारण्यासाठी शेतकऱ्यांनी एकजूट दाखविण्याची गरज असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय्य पहिली उचल जाहीर होत नाही, तोपर्यंत आंदोलनाची भूमिका कायम ठेवण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ऊसतोड बंद ठेवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला सहकार्य करावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले. शेतकऱ्यांच्या एकजुटीतूनच कारखानदारांवर दबाव निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली.जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.पहिल्या उचलीवरून सुरू झालेला ऊस दराचा संघर्ष आता जिल्हास्तरावर तीव्र होण्याची चिन्हे आहेत. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निश्चित झालेल्या आंदोलनाच्या भूमिकेला शेतकऱ्यांचा किती प्रतिसाद मिळतो आणि कारखानदार यावर काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button