देशभक्तीच्या सुरेल निनादात समूहगीत गायन स्पर्धा संपन्न
देशभक्तीच्या सुरेल निनादात समुहगीत गायन स्पर्धा संपन्न
संचार वृत्त
अकलूज :स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशभक्तीची चेतना रुजविण्यासाठी व त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी येथील सदाशिवराव माने विद्यालयात देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
इयत्ता पाचवी ते बारावी अशा एकूण सात गटांमध्ये आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी तिरंग्याच्या तीन रंगांचा वेश परिधान करून आपली कला सादर केली. स्पर्धेत विविध गटातून एकूण ९० स्पर्धेकांनी सहभाग नोंदविला.
देशभक्तीपर वातावरण निर्माण करण्यासाठी चित्रकला विभागाने मनमोहक असा रंगमंच तयार केला होता.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बलसागर भारत होवो, जहाँ डाल-डाल पर, ए मेरे वतन के लोगो, मेरा कर्मा तू , ए वतन, ए वतन, जय जय महाराष्ट्र माझा, सारे जहाँ से अच्छा अशी रोमहर्षक देशभक्तीपर गीते सादर करून रसिकांची मने देशभक्तीने प्रफुल्लित केली. स्पर्धकांच्या सुरेल गीतांना विद्यालयाच्या सयाजीराजे वाद्य वृंदने संगीताची साथ दिली.
स्पर्धेचे परीक्षण संगीत विशारद स्नेहा शिंदे यांनी केले. स्पर्धेचे निकाल १५ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहेत.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अमोल फुले सर, उपमुख्याध्यापक श्री दत्तात्रय घंटे सर, सर्व पर्यवेक्षक, शिक्षक प्रतिनिधी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संगीत विभागाचे सुहास पवार यांनी तर आभार प्रदर्शन विष्णू राजगुरू यांनी केले. स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडण्यासाठी सर्वांनी मोलाचे परिश्रम घेतले.