solapur

दिवाळीनिमित्त शंभर रुपये ऊस बिल,साखर घरपोच,१५ऑक्टोंबर पासून गळीत हंगाम सुरू

दिवाळीनिमित्त शंभर रुपये ऊस बिल,साखर घरपोच,१५ऑक्टोंबर पासून गळीत हंगाम सुरू

संचार वृत्त अपडेट 

 विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना मागील हंगामात गळीत झालेल्या ऊसाला आतापर्यंत २८०० रूपये प्रति टन बिल दिले आहे, आता दिवाळीनिमित्त शंभर रुपये हप्ता देण्यात येणार असून कामगारांना एक महिन्याचा बोनस देण्यात येईल तसेच दिवाळी सणासाठी ३० रुपये किलो दराने ऊस पुरवठादार व सभासद शेतकऱ्यांना घरपोच साखर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे उपाध्यक्ष वामनराव उबाळे यांनी केले आहे.

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या २६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बबन दादा शिंदे हे हृदय प्रत्यारोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर अमेरिकेत सेंट लुईस येथील सी जे बी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, त्यामुळे मागील पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थापक अध्यक्ष बबन दादा शिंदे यांच्या अनुपस्थितीत शांतपणे आणि उत्साहाने पार पडली.

प्रारंभी स्वर्गीय विठ्ठलभाऊ शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांनी प्रास्ताविक करून अहवालाचे वाचन केले त्यांनी सभेत मांडलेले सर्व विषय एक मताने, मोठ्या आवाजात मंजूर करण्यात आले. याप्रसंगी कारखान्याचे संचालक व करमाळा तालुक्यातील कम लाभवानी साखर कारखान्याचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे म्हणाले की अमेरिकेत आदरणीय बबन दादांच्या प्रकृतीमध्ये शस्त्रक्रियेनंतर लक्षणीय सुधारणा होत आहे

व दोन महिन्यानंतर दादा पुन्हा आपल्या सर्वांच्या मध्ये परत येत आहेत ही आनंदाची बाब आहे. त्यांच्या अनुपस्थितीत आगामी गळीत हंगाम आपणा सर्वांच्या सहकार्याने व्यवस्थित पार पडेल असा आम्हाला ठाम विश्वास आहे. कारखान्याचे पिंपळनेर युनिट अडीच हजार मेट्रिक टनावरून आज १५ हजार मेट्रिक टन प्रतिदिन गाळप करत आहे तर याचे दुसरे युनिट करकंब येथेअतिशय व्यवस्थित चालत आहे. या दोन्ही ठिकाणी शेतकऱ्यांचा विश्वास असल्यामुळेच

कारखान्याची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. प्रत्येक दहा दिवसाला शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे पैसे बँक खात्यावर जमा करून महाराष्ट्रामध्ये विठ्ठलराव शिंदे कारखान्याने साखर कारखानदारी मध्ये मोठा आदर्श निर्माण केला आहे हे कोणीही ना करू शकत नाही. पुढील गळीत हंगाम १५ ऑक्टोबर रोजी सुरू होणार असून गळीतास येणार्या उसाला परिसरातील इतर साखर कारखान्यांच्या पेक्षा एक रुपया तरी भाव जास्त देण्यात येईल हे निश्चित.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button