
महिन्याला ५ टक्के परताव्याचे आमिष दाखवून ६१ लाखांची फसवणूक; ‘लक्ष्मी कृपा’च्या मुख्य सूत्रधारास अटक
ज्यादा परताव्याच्या नादात 61 लाखाची फसवणूक मुख्य आरोपींना अटक
संचार वृत्त अपडेट
महिन्याला तब्बल ५ टक्के परतावा आणि आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून सर्वसामान्य गुंतवणूकदारांची ६१ लाख ३६ हजार ६९०/-रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ‘लक्ष्मी कृपा’ संस्थेच्या योजनेच्या ११ संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. संशयित आरोपींनी ‘लक्ष्मी कृपा’ नावाच्या योजनेअंतर्गत नागरिकांना आकर्षित करण्यासाठी एक जाळे विणले होते. “आमच्या योजनेत पैसे गुंतवल्यास दरमहा ५ टक्के इतका भरघोस परतावा दिला जाईल, तसेच व्याजाचा दरही इतर बँकांपेक्षा अधिक असेल,” असे आमिष आरोपींनी नागरिकांना दाखवले. सुरुवातीला काही जणांना विश्वास संपादन करण्यासाठी परतावा देण्यात आला. या आमिषाला बळी पडून अनेक नागरिकांनी आपल्या कष्टाची पुंजी या योजनेत गुंतवली.काही महिने उलटल्यानंतर गुंतवणूकदारांना मिळणारा परतावा अचानक बंद झाला. नागरिकांनी जेव्हा आपल्या मूळ रकमेची आणि व्याजाची मागणी केली, तेव्हा संशयितांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. प्राथमिक तपासाअंती तब्बल ६१ लाख ३६हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. हा फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी ‘लक्ष्मी कृपा’शी संबंधित ११ जणांविरुद्ध फसवणूक आणि संघटित गुन्हेगारीच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे जलद फिरवत मुख्य आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी सोमनाथ साधू खराडे चंद्रकला सोमनाथ खराडे यांना न्यायालयाने दहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून अन्य आरोपींच्या तपासाला वेळ आला आहे
याबाबत अकलूज यशवंत नगर येथील रवी तात्यासाहेब शिंदे यांनी फिर्याद दाखल केले २१ एप्रिल २०२५ ते २०मार्च २०२६ या कालावधीत अमिष दाखवून रक्कम जमा करून घेतली असे फिर्यादित म्हटले आहे या प्रकरणात सोमनाथ खराडे,चंद्रकला खराडे,आनंदराव मगर,मनीषा मगर,संतोष निकम,सोनाली निकम,विशाल पवार, वर्षा पवार, विलास लायगे,रेखा लायगे व संग्राम गोडसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (बी एन एस) २०२३मधील कलम ३१८(४)३१६(२)३१६(५)३(५) व महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण अधिनियम १९९९ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
• अवास्तव परताव्याला बळी पडू नये
“लक्ष्मी कृपा” किंवा अशाच प्रकारच्या कोणत्याही योजनेत ज्या नागरिकांनी गुंतवणूक केली आहे आणि ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी त्वरित संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधून आपले जबाब आणि पुराव्यांची कागदपत्रे सादर करावीत. तसेच, महिन्याला ५% (म्हणजे वर्षाला ६०%) सारख्या अवास्तव परताव्याच्या आमिषांना नागरिकांनी बळी पडू नये.
निरज उबाळे, पोलिस निरीक्षक,अकलुज



