माळेवाडी (अ)तलाव असूनही नागरिक तहानलेले ; जलशुद्धीकरण प्रकल्पाचा बोजवारा

माळेवाडी (अ)तलाव असूनही नागरिक तहानलेले ; जलशुद्धीकरण प्रकल्पाचा बोजवारा
तलावात पाणी पण पिण्याला बोरवेलचे !
तात्काळ शुद्ध पाणी देण्याची मागणी अडीच कोटींचा निधी धुळीस ?
संचार वृत्त अपडेट
लक्ष्मीकांत कुरुडकर (मो.9405703990)
माळेवाडी (अ) येथील ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी २०१४ मध्ये शासनाकडून तब्बल २ कोटी ५० लाख रुपयांचा घसघशीत निधी मंजूर झाला होता. २०१५ मध्ये मोठ्या दणक्यात या तलावाचा लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र, आजच्या घडीला हा तलाव आणि जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्णपणे धूळ खात पडला असून, नागरिकांसाठी ‘तलाव उशाला कोरड घशाला ‘अशी बिकट अवस्था झाली आहे.
जलशुद्धीकरणासाठी आवश्यक असलेली ना योग्य मोटार, ना वाळू, ना तुरटी तिथे उपलब्ध आहे.कोट्यवधी रुपये खर्च करूनही आजतागायत माळेवाडीतील ग्रामस्थांना या प्रकल्पातून एक थेंबही शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळालेले नाही. तलावात पाणी असूनही त्याचा उपयोग नागरिक किंवा जनावरांना होत नसल्यामुळे, नाइलाजाने नागरिकांना बोरवेलचे अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार खंडाळी पाटबंधारे विभागाला ११ लाख ६० हजार ३९० रुपये भरण्यात आले आहेत, तर अजूनही ६ लाख ५ हजार ९५० रुपये इतकी रक्कम थकीत आहे. लाखो रुपयांचा असा व्यवहार होऊनही प्रकल्पाची झालेली दुरवस्था प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.या सर्व गंभीर प्रकाराची दखल घेत भाजपचे सरचिटणीस अमित टिळेकर ,शाखाध्यक्ष नवनाथ साठे ,उपाध्यक्ष दिलीप बनकर,संजय खुडे व लहू सुगावकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तलावाची आणि पंप हाऊसची पाहणी केली.

त्यांनी तेथील विदारक परिस्थितीचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. प्रशासनाने याकडे तत्काळ लक्ष देऊन, बंद पडलेली जलशुद्धीकरण यंत्रणा सुरू करावी आणि माळेवाडीच्या नागरिकांना लवकरात लवकर शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नागरिकांना नाईलाजास्तव अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे
माळेवाडीतील जनतेला शुद्ध आणि स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी २०१५ मध्ये मोठ्या आव्हानाने या तलावाचे उद्घाटन झाले. परंतु, आज परिस्थिती काय आहे ? जलशुद्धीकरण केंद्र पूर्णपणे धुळीस मिळाले असून नागरिकांना नाइलाजाने आजारात ढकलणारे बोरवेलचे अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे.हा तलाव म्हणजे प्रशासकीय निष्काळजी पणाचा जिवंत नमुना बनला असून येत्या काही दिवसांत जलशुद्धीकरण यंत्रणा पूर्ण क्षमतेने सुरू करून माळेवाडीतील प्रत्येक नागरिकाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळालेच पाहिजे !अन्यथा अनास्थेविरोधात आंदोलन छेडले जाईल.
अमित टिळेकर (सरचिटणीस भाजप)
लवकरच शुद्ध पाणी पुरवठा सुरू करणार
माळेवाडी (अ) येथील तलाव आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या समस्येबाबत नगर परिषद पूर्णपणे गंभीर आहे. नागरिकांना भेडसावणारा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन पाणी समितीच्या आणि नगर परिषदेच्या विशेष बैठकीत हा विषय अजेंड्यावर घेतला होता.बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करून जलशुद्धीकरण यंत्रणा पुनरुज्जीवित करणे, आवश्यक साहित्याची उपलब्धता करणे आणि थकीत बाबी पूर्ण करून प्रकल्प कार्यान्वित करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून, लवकरात लवकर जलशुद्धीकरण यंत्रणा पूर्ण क्षमतेने सुरू केली जाईल माळेवाडीतील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी देण्यास अकलूज नगर परिषद कटिबद्ध आहे. लवकरच शुद्ध पाणी त्यांच्या नळाला येईल.
नामदेव गलांडे (सभापती,पाणी समिती अकलूज नगर परिषद)



