१२५ वर्षांची महालक्ष्मी उपासनेची परंपरा आजही अखंड

१२५ वर्षांची महालक्ष्मी उपासनेची परंपरा आजही अखंड
गुळवे कुटुंबाने जपला पूर्वजांचा वारसाशाडू मातीपासून तयार केलेल्या प्राचीन महालक्ष्मीच्या मुखवट्यांचे पूजन
संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)
सुमारे १२५ वर्षांपूर्वी शाडू मातीपासून तयार करण्यात आलेल्या महालक्ष्मीच्या मुखवट्यांची परंपरा आजही गुळवे कुटुंबीयांनी श्रद्धेने जपली आहे. पूर्वजांनी सुरू केलेली महालक्ष्मीची उपासना, पूजन आणि बसविण्याची परंपरा पिढ्यान्पिढ्या पुढे चालत असून, आज चौथ्या पिढीतील कुटुंबीयांकडूनही हा धार्मिक वारसा भक्तिभावाने जतन केला जात आहे.
गुळवे कुटुंबाकडे असलेले हे महालक्ष्मीचे मुखवटे विशेष ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाचे मानले जातात. यातील एक मुखवटा कै. गोदाबाई शंकरराव गुळवे यांच्या आई कासाबाई जगन्नाथ शेटे यांच्याशी संबंधित असून, दुसरा मुखवटा कै. धोंडीआप्पा भगवंत गुळवे यांचा असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात येते. शाडू मातीपासून तयार केलेल्या या मुखवट्यांना सुमारे १२५ वर्षांचा वारसा लाभला आहे.

पूर्वजांकडून सुरू झालेली ही परंपरा पुढे सोमनाथ शंकरराव गुळवे व रतनबाई सोमनाथ गुळवे यांच्या कुटुंबीयांनी जपली. त्यांच्या पुढील पिढीनेही महालक्ष्मीची स्थापना व पूजनाची परंपरा कायम ठेवली असून, आज चौथ्या पिढीतील पद्मा चंद्रशेखर गुळवे, वैशाली दत्तात्रय गुळवे आणि उत्कर्षा गोपाळ गुळवे यांच्याकडून ही परंपरा पुढे नेली जात आहे.महालक्ष्मीच्या पूजनासाठी घरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली असून, फुलांची आरास, विविध नैवेद्य, फळे तसेच पारंपरिक पद्धतीने पूजाविधी करण्यात आला. महालक्ष्मीच्या मुखवट्यांसमोर विधिवत पूजा-अर्चा करून कुटुंबीयांनी देवीचे आशीर्वाद घेतले.
आधुनिकतेच्या काळात अनेक पारंपरिक प्रथा लोप पावत असताना, गुळवे कुटुंबाने तब्बल १२५ वर्षांची महालक्ष्मी उपासनेची परंपरा जतन करून ठेवली आहे. त्यामुळे हा केवळ धार्मिक विधी नसून, पूर्वजांच्या श्रद्धा, संस्कृती आणि कौटुंबिक परंपरेचा वारसा पुढील पिढीकडे सुपूर्द करण्याचा एक सुंदर प्रयत्न ठरत आहे.



