माळीनगर ते आदमापूर २४० किमी पायी वारी पूर्ण; तीन भाविकांनी ८ दिवसात गाठले श्री बाळूमामा मंदिर

माळीनगर ते आदमापूर २४० किमी पायी वारी पूर्ण; तीन भाविकांनी ८ दिवसात गाठले श्री बाळूमामा मंदिर
संचार वृत्त अपडेट
माळीनगर (ता. माळशिरस) येथील मनोहर सकट, सुरज भाट व सुरज मल्लाव या तीन भाविकांनी माळीनगर ते श्री सदगुरु संत बाळूमामा देवालय आदमापूर (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) अशी सुमारे २४० किलोमीटरची पायी वारी भक्तीरसपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पूर्ण केली.
श्री सदगुरु संत बाळूमामा हे महाराष्ट्र-कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या बाळूमामांवर सर्व जाती-धर्माच्या लोकांची अपार श्रद्धा आहे. “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” या एका जयघोषात भाविकांची सर्व दुःखे दूर होतात, अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे. त्यांच्या आशीर्वादाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, म्हणून दरवर्षी हजारो भक्त पायी वारी करत आदमापूरला दर्शनासाठी जात असतात.

माळीनगर परिसरातील मोलमजुरी करणारे रहिवासी मनोहर जनार्दन सकट (वय ४६), सुरज दादा भाट (वय ४१) व सुरज जगन्नाथ मल्लाव (वय १८) यांनी बाळूमामावरील श्रद्धेपोटी आणि माळीनगर(थोरात वस्ती,दोरकर मळा ) येथील श्री सदगुरु संत बाळूमामा मंदिराचे मुख्य मालक शिवाभाऊ केरोबा दोरकर तसेच आत्मलिंग राघू कारंडे,भक्त राजेंद्र(खनू) गेनबा वाकडे, राजेंद्र बलभीम भोसले, धनाजी नागनाथ बनसोडे, उमाजी तानाजी जाधव यांचे मार्गदर्शनाखाली व सहकार्याने या तिघांनी कोणत्याही वाहनाचा वापर न करता दि. ३१ ऑगस्ट रोजी माळीनगर येथून या वारीला भक्तिमय वातावरणात प्रारंभ केला. रोज सरासरी ३० किलोमीटर पायी चालत पहिला मुक्काम पिलीव, आटपाडी, वायफळे, भिलवडी, पेठ वडगाव, कागल, मेलगे येथील ७ व्या मुक्कामानंतर दि. ७ सप्टेंबर रोजी आठव्या दिवशी रात्री ते आदमापूर मंदिरात पोहोचून त्यांनी श्री बाळूमामा यांचे दर्शन घेवून “माळीनगर ते आदमापूर”पायी वारी भक्तीमय वातावरणात पूर्ण केली. त्यांच्या या भक्तीमय उपक्रमाचे माळीनगर व पंचक्रोशीत कौतुक होत आहे.



