अकलूज नगर परिषदेची निवडणूक लक्षवेधी होणार

अकलूज नगर परिषदेची निवडणूक लक्षवेधी होणार
संचार वृत्त अपडेट
आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक पक्षातर्फे आपल्याच गटाचा अकलूज चा महापौर होण्याचे भाकीत नेतेमंडळींकडून केले जात आहे. अकलूज आमचे आहे असे ठणकावून सांगितले जात आहे. मात्र, याचे उत्तर निवडणुकीनंतर मिळणार आहे. आता फक्त मेळावे, रणनीती, पक्षाचा अजेंडा या साऱ्या घडामोडी घडत आहेत. लवकरच महाराष्ट्रात महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगाने सर्वच आघाड्या, पक्षांतर्फे जोडण्या लावताना दिसून येत आहे. लोकप्रतिनिधींना आपल्या मूलभूत गरजा, समस्या सोडविण्यासाठी निवडून दिलेले असते. पण नेते मंडळी पक्ष फोडाफोडी, एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांट्या उड्या मारणे असल्या प्रकारामुळे राजकारणाची पार दिशा बदलली आहे. महागाई, अतिवृष्टी, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण,रस्ते यासारख्या ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन गंभीर टीका केली जात आहे. यंदाची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. अनेक पक्ष, आघाड्यांना नगरपरिषदेवर आपली सत्ता येण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. अकलूज नगर परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार यावरुन सामना होणार आहे. आता चढाओढ सुरु झाली आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांमध्येही अंतर्गत चढाओढ असल्याने उत्कंठावर्धक होणार याचे अंदाज बांधले जात आहेत. एकंदरीत अकलूज नगरपरिषद स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. माळशिरस तालुक्याची आर्थिक राजधानी आणि आशिया खंडात नावाजलेले अकलूज शहराची असलेली ख्याती हे लक्षात घेता प्रत्येक राजकारणी अकलूज आपलेच असावे असा विश्वास व्यक्त करत आहे.