काळजाचा थरकाप! अकलूज नवीन बस स्थानकामागे भीषण अपघात; बागेचीवाडीतील ४२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

काळजाचा थरकाप! अकलूज नवीन बस स्थानकामागे भीषण अपघात; बागेचीवाडीतील ४२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
संचार वृत्त अपडेट
अकलूज येथील नवीन बस स्थानकाच्या पाठीमागे, महावीर पथकडे जाणाऱ्या रोडवर प्रवीण इलेक्ट्रॉनिक्ससमोर दुपारी ३ वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. एका भरधाव भारत बेंझ मिक्सर वाहनाने (टँकर) मोटरसायकलला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात ४२ वर्षीय तरुण प्लंबरचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातानंतर कोणतीही मदत न करता मिक्सर चालक घटनास्थळावरून पसार झाला असून, अकलूज पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सचिन सुभाष काळे (वय ४२, रा. बागेचीवाडी, पद्मावतीनगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मृत सचिन काळे हे प्लंबिंग आणि मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. आज दिनांक १० जून २०२६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ते खाजगी कामासाठी आणि प्लंबिंगच्या कामाच्या निमित्ताने त्यांच्या पॅशन प्रो मोटरसायकलने (MH 45 M 3312) अकलूज येथे आले होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास अकलूज येथील प्रवीण इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोर समोरून येणाऱ्या भारत बेंझ मिक्सर वाहनाने (MH 42 BF 6573) सचिन यांच्या मोटरसायकलला समोरून अत्यंत वेगाने आणि हलगर्जीपणाने जोराची धडक दिली. या भीषण धडकेत सचिन गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले.अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आणि ओळखीच्या लोकांनी सचिन यांना तातडीने उपचारासाठी अकलाई हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच सचिन यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली असता, अपघातग्रस्त मिक्सर चालकाने आपले नाव मधुकर आण्णा जानकर (रा. जाधववाडी, भांबुर्डी, ता. माळशिरस) असल्याचे सांगितले. मात्र, जखमीला कोणतीही वैद्यकीय मदत न करता किंवा पोलिसांना माहिती न देता तो चालक घटनास्थळावरून गाडी बाजूला लावून पसार झाला.याप्रकरणी मृत सचिन यांचे ७० वर्षीय वडील सुभाष विष्णू काळे यांनी अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून मिक्सर चालक मधुकर आण्णा जानकर याच्याविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४१७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१), २८१, मो.वा.का. १८४, १३४(A), १३४(B) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल (HC) ९८० बागडे करत आहेत. तरुण कर्त्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याने बागेचीवाडी परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे अतुल माने,आदेश नवसारें, अजय कुमार हे तिघे पण इव्हीटी इन्फ्रा कंपनी बारामतीचे सुपरवायझर आहेत यांच्या गहाळ कामाने व कामाचे नियोजन नसल्याने हा अपघात घडलेला आहे. नगर सेवक महेश शिंदे आणि दिपाली वाघमोडे यांनी सतत फोन करून लोकांच्या तक्रारीवरून कंपनीच्या सुपरवायझरला फोन लावला असता फोन उचलला जात नव्हता आणि उडवा उडवी चे उत्तरे देत होते.वेळीच दखल घेतली असती तर हा अपघात टळला असता असे शिंदे यांनी सांगितले.


