अकलूज नगर परिषदेत सत्ताधाऱ्यांनीच फिरवली सभेला पाठ

अकलूज नगर परिषदेत सत्ताधाऱ्यांनीच फिरवली सभेला पाठ ?
भाजपच्या ४ नगरसेवकांची मात्र उपस्थिती
महत्त्वाचे विषय लटकले
संचार वृत्त अपडेट
अकलूज नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा व सर्वसाधारण सभा मंगळवार, दि.२५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र, या अत्यंत महत्त्वाच्या सभेला शहरातील सत्ताधारी नगरसेवकांनी पूर्णपणे पाठ फिरवल्याने नगरपरिषदेतील अंतर्गत धुसफूस आणि गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
सत्ताधाऱ्यांनी दांडी मारली असताना भारतीय जनता पार्टीच्या चारही नगरसेवकांनी सभेला उपस्थित राहून आपली जबाबदारी बजावली. त्यामुळे सत्ताधारी नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या अजेंड्यालाच केराची टोपली दाखविल्याचे चित्र निर्माण झाले आहे.नगरपरिषद सभागृहात शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते.
ठप्प झालेले महत्त्वाचे विषय : केंद्र शासन पुरस्कृत ‘अमृत २.०’ अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कर्जाच्या अटी-शर्ती मान्य करणे व त्रिपक्षीय करारास मंजुरी,मलनिसारण कामासाठी STP पंप हाऊसकरिता खाजगी जागा खरेदी.घनकचरा व्यवस्थापनासाठी कचरा डेपोकरिता खाजगी जागा भाडेतत्त्वावर घेणे,नागरी वस्ती सुधारणा योजना (२०२६-२७)अंतर्गत विविध विकास कामे,शहरातील बेकायदेशीर फ्लेक्स, बोर्ड व कट्टे काढणे यांसह तब्बल १४ हून अधिक नागरी हिताचे विषय एवढे महत्त्वाचे विषय अजेंड्यावर असताना सत्ताधारी नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे शहराच्या विकास कामांवरील चर्चा पूर्णपणे ठप्प झाली.दरम्यान, नगराध्यक्षांनी ही सर्वसाधारण सभा आता ३१ ऑगस्ट रोजी घेण्याचे योजले आहे. त्यामुळे ३१ ऑगस्टच्या सभेला सत्ताधारी नगरसेवक उपस्थित राहून शहराच्या विकासाला गती देतात की पुन्हा दांडी मारतात, याकडे संपूर्ण अकलूजकरांचे लक्ष लागले आहे.
• सत्ताधाऱ्यांची दांडी म्हणजे विकासाला खोडा
अकलूज नगरपरिषदेच्या कालच्या सर्वसाधारण सभेत जे घडले ते दुर्दैवी आहे.जिव्हाळ्याचे विषय अजेंड्यावर असताना सत्ताधारी नगरसेवकांनी अनुपस्थित राहणे म्हणजे जनतेच्या विश्वासघात आहे.भारतीय जनता पार्टीने नेहमीच विकासाच्या राजकारणाची भूमिका घेतली आहे. आमचे चारही नगरसेवक सभेला पूर्ण वेळ उपस्थित होते. आम्ही सत्तेत असो वा नसो, अकलूजच्या विकासाच्या प्रत्येक विषयाला आमचा पाठिंबा असेल.सत्ताधारी गटात चाललेली अंतर्गत धुसफूस आता नगरपरिषदेच्या कामकाजावर परिणाम करत आहेत. चांगल्या प्रस्तावांना केवळ राजकारणापोटी विरोध करणे योग्य नाही. ३१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सभेत तरी सत्ताधाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून उपस्थित राहावे.
अमित टिळेकर (भाजप सरचिटणीस )


