बिजवडी पवार वस्तीची लेक झाली साहेब वैष्णवी कदम यांची कर सहाय्यक पदी निवड जिद्द आणि मेहनतीच्या बळावर यशाला गवसणी

बिजवडी पवार वस्तीची लेक झाली साहेब
वैष्णवी कदम यांची कर सहाय्यक पदी निवड
जिद्द आणि मेहनतीच्या बळावर यशाला गवसणी
संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)
बिजवडी (ता. माळशिरस) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट-क सेवा परीक्षा २०२४ (जाहिरात क्र. ११८/२०२५) चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात बिजवडी (पवार वस्ती) येथील कु. वैष्णवी दादासाहेब कदम यांनी घवघवीत यश मिळवत कर सहाय्यक (Tax Assistant) पदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशाबद्दल बिजवडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभात ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन वैष्णवी यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.वैष्णवी कदम यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासात सातत्याने कष्ट घेत हे यश खेचून आणले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज (२००६-२०१२) येथे, तर माध्यमिक शिक्षण जिजामाता विद्यालय, सराटी (२०१३-२०१८) येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी सदाशिवराव माने विद्यालयातून विज्ञान शाखेतून (२०१९-२०) पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील नामांकित फर्ग्युसन महाविद्यालयातून राज्यशास्त्र विषयात बी.ए. पदवी (२०२१-२०२३) संपादन केली.शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करत कठोर परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी MPSC परीक्षेत हे यश संपादन केले आहे.
या सत्कार समारंभास महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब शिंदे, दादासाहेब कदम, नागनाथ कदम, भीमराव यादव, आर्यन शिंदे यांच्यासह महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.वैष्णवी यांच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या यशाने परिसरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा मिळाली आहे.
आपल्या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना वैष्णवी कदम म्हणाल्या, “माझ्या यशाच्या प्रवासात सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा, आशीर्वाद, विश्वास आणि प्रोत्साहन हेच माझे खरे बळ ठरले. प्रत्येकाच्या शब्दांनी मला आणखी मेहनत करण्याची प्रेरणा मिळाली.”



