solapur

माळशिरस ; स्वाभिमानी आक्रमक
दुसरा हप्ता तात्काळ देण्याची मागणी

संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)

माळशिरस तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन 300 रुपये दुसरा हप्ता तातडीने बँक खात्यात जमा करावा, अन्यथा कारखान्यातील साखर बाहेर पडू देणार नाही, असा खणखणीत इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.माळशिरस तालुक्यातील सहकार महर्षी,दि सासवड माळी,पांडुरंग सहकारी, शंकर सहकारी, ओंकार शुगर, सदगुरू श्री श्री यांना देण्यात आले आहे.स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तालुक्यातील साखर कारखान्यांना निवेदन दिले.

यंदा खतांच्या गोणीचे दर 2500 ते 2700 रुपयांवर गेले आहेत. अडसाली लागवड, मशागत, औषधे, मजुरी आणि ट्रॅक्टर भाड्यात मोठी दरवाढ झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे.त्यामुळे त्याला तातडीच्या मदतीची गरज आहे.सध्या साखरेचा विक्री दर ५००० ते ५३००रुपये क्विंटल असून किरकोळ बाजारात 65 रुपये किलोने विक्री सुरू आहे. बी-हेवी मोलॅसिस 67 रु. लिटर, हेवी मोलॅसिस 55 रु. लिटर आणि कच्चे अल्कोहोल 63 रु. लिटर दराने विकले जात आहे. त्यामुळे कारखान्यांची आर्थिक स्थिती चांगली असून त्यांनी नफ्यातील हिस्सा शेतकऱ्यांना दिलाच पाहिजे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

जिल्हातील काही कारखान्यांनी तर अजून पहिला हप्ताही दिलेला नाही, तोही तात्काळ जमा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.या आंदोलनात ऊस दर संघर्ष समितीचे दीपक भोसले, सचिन पाटील, भानुदास सालगुडे-पाटील, जेष्ठ नेते मगन काळे, विजय नेवसे, अमरसिंह माने-देशमुख, दत्ता भोसले, गोपाळ घार्गे, निवास नागणे, दीपक सावंत, नेमचंद शिंदे, हनुमंत पाटील, कैलास इंगळे, सचिन आटकळे, विलास काळे, विजय वाघंबरे, उमेश काळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

• शेतकऱ्यांनी थोडी कळ सोसून आंदोलना ला पाठिंबा द्यावा

यंदा शेतकऱ्यांनी ऊसतोडीची गडबड करू नये. कांडीला सोन्याचा भाव मिळवून देऊ. पाऊस कमी झाल्याने उसाची वाढ झालेली नाही. कर्नाटकातील कारखाने लवकर सुरू होत असल्याने महाराष्ट्रात उसाचा तुटवडा भासणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडी कळ सोसून आंदोलनाला पाठबळ द्यावे.
अजित बोरकर, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button