solapur

अकलूजकरांची पाण्याची चिंता मिटणार ! अमृत योजनेतून १७५ कोटी, विझोरी तलावाची क्षमता ६८० दशलक्ष लीटर होणार

अकलूजकरांची पाण्याची चिंता मिटणार !

अमृत योजनेतून १७५ कोटी, विझोरी तलावाची क्षमता ६८० दशलक्ष लीटर होणार

नवीन टाक्या तलाव बळकटीकरण होणार

संचार वृत्त अपडेट(लक्ष्मीकांत कुरुडकर)

अकलूज शहराची अनेक वर्षांची पाणी टंचाईची समस्या आता कायमची मिटणार आहे. केंद्र सरकारच्या अमृत जल योजनेंतर्गत मंजूर झालेल्या १७५ कोटी रुपयांच्या निधीतून विझोरी येथील पाणी साठवण तलावाची क्षमता तब्बल चौपट केली जात असून, शहराला दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी विविध ठिकाणी नवीन पाण्याच्या टाक्या उभारल्या जात आहेत.
या योजनेच्या कामांना ७ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रारंभ झाला असून ही सर्व कामे येत्या वर्षाअखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाचे अभियंता राम भगनुरे यांनी सांगितले
अकलूज शहराला विझोरी येथील जलशुद्धीकरण केंद्र व साठवण तलावातून पाणीपुरवठा होतो. या तलावाची मूळ क्षमता २८० दशलक्ष लीटर असली तरी गाळ साचणे, पडझड आणि दुरवस्थेमुळे ती केवळ १२० ते १५० दशलक्ष लीटरवर आली होती. अमृत योजनेतून आता तलावाचे खोलीकरण, साईड काँक्रिटीकरण आणि भरावाचे बळकटीकरण युद्धपातळीवर सुरू आहे. जेसीबीच्या सहाय्याने काम सुरू असून पूर्ण झाल्यावर तलावाची क्षमता थेट ६८० दशलक्ष लीटरपर्यंत वाढणार आहे.निरा उजवा कालवा ७७ मैल ते विझोरी साठवण तलावापर्यंत ९ किमी लांबीची थेट पाईपलाईन टाकली जात आहे. त्यापैकी ६ किमीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित ३ किमीचे काम लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे कालवा बंद असतानाही तलावाला थेट पाणी मिळणार आहे.एकूणच, ही सर्व कामे पूर्ण झाल्यावर गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणारी अकलूजची पाणी टंचाई कायमची दूर होणार असल्याचे भगनुरे यांनी सांगितले.

• शहरात 5 ठिकाणी नव्या पाण्याच्या टाक्या

अमृत जल योजनेंतर्गत अकलूज शहराला दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी विझोरी येथील पंप हाऊस शेजारी, तसेच माळेवाडी, शिवाजीनगर, विद्यानगर, पंचवटी, राऊतनगर व महावीर पथ येथे नवीन पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे शहरातील सर्व भागात समान दाबाने पाणी मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button