
व्यसनमुक्तीच्या १९ वर्षांच्या तपश्चर्येचा सन्मान!
प्रा.धनंजय देशमुख यांची शालेय शिक्षण विभागाच्या जिल्हा समन्वयकपदी निवड
संचार वृत्त अपडेट
विद्यार्थी आणि युवकांमध्ये वाढते व्यसन ही गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमध्ये नशामुक्तीविषयी मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने प्रा. धनंजय शालिनी शामराव देशमुख यांची सोलापूर जिल्हा समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी, प्रशिक्षण, नियोजन व समुपदेशनाची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.
प्रा.देशमुख हे अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाच्या महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला, यशवंतनगर येथे उच्च माध्यमिक विभागात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्त युवक संघाच्या माध्यमातून ते संपूर्ण महाराष्ट्रभर व्यसनमुक्तीचे कार्य करतात.
त्यांच्या १९ वर्षांच्या कार्यात३१ डिसेंबर – दारू नको, दूध प्या’ हा अनोखा विधायक उपक्रम आणि ‘चला व्यसनांची होळी करू या’ म्हणत तंबाखूजन्य पदार्थांची होळी करण्याचा उपक्रम राज्यभर गाजला आहे. २६ जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभागाच्या सहकार्याने ते शाळांमध्ये जनजागृती करतात.इतकेच नव्हे तर प्रा. देशमुख हे सद्गुरु श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग शिक्षक, भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचे मान्यताप्राप्त योग शिक्षक असून त्यांनी एम.ए. योगशास्त्र पदवी संपादन केली आहे. त्यांनी ४४ वेळा रक्तदान केले असून सर्पअभ्यासक म्हणून सापांबद्दलचे गैरसमज दूर करण्याचे कार्य आणि ‘आम्ही अकलूजकर’ समूहातून सामाजिक कार्यही ते करतात.
त्यांच्या निवडीबद्दल माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, खा. धैर्यशील मोहिते पाटील, संग्रामसिंह मोहिते पाटील, स्वरूपाराणी मोहिते पाटील, नगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील, सयाजीराजे मोहिते पाटील, सचिव अभिजीत रणवरे, मुख्याध्यापक संजय गळीतकर, शिक्षक वृंद, आर्ट ऑफ लिव्हिंग साधक व व्यसनमुक्त युवक संघाच्या सदस्यांनी अभिनंदन केले आहे.



